Join us

Sugarcane FRP साखरेचे दरही वाढले आमचे एफआरपीच्या वरील १०० रुपये मिळणार की नाही?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2024 10:23 AM

Sugarcane Factory कारखान्यांनी २०२२-२३ व्या गळीत हंगामात घेतलेल्या उसाचे प्रतिटन ५० आणि १०० रुपयांप्रमाणे १५ कोटी रुपये शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला होता.

कारखान्यांनी २०२२-२३ व्या गळीत हंगामात घेतलेल्या उसाचे प्रतिटन ५० आणि १०० रुपयांप्रमाणे १५ कोटी रुपये शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला होता. एफआरपीपेक्षा जादाची रक्कम देण्यासाठी साखर आयुक्तांची कारखानदारांना परवानगी घ्यावी लागते.

यासाठी सोनहीरा कारखान्यासह तीन कारखान्यांनीच परवानगी मागितली आहे. उर्वरित कारखाने एफआरपी अधिक १०० रुपये देण्याचे विसरले आहेत. ऊस दराची कोंडी फोडताना स्वाभिमानी शेतकरी संघटना, साखर कारखानदार आणि जिल्हा प्रशासनाची सांगलीत बैठक झाली होती.

या बैठकीमध्ये ज्या कारखान्याने प्रतिटन तीन हजार रुपयांपेक्षा जास्त दर दिला आहे. त्यांनी ५० रुपये द्यायचे व ज्या कारखाने तीन हजार रुपयांपेक्षा कमी भाव दिला आहे, त्यांनी १०० रुपये द्यायचे होते.

या निर्णयानुसार साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांना प्रतिटन १०० आणि ५० रुपये देणे गरजेचे होते. पण जिल्ह्यातील तीन कारखान्यांनी शेतकऱ्यांना जादा दर देण्यासाठी साखर आयुक्तांकडे परवानगी मागितली आहे. उर्वरित १४ कारखान्यांच्या व्यवस्थापनाने जादा दराबाबत संचालकांच्या बैठकीत चर्चाही केली नाही.

५० आणि १०० रुपये यानुसार जिल्ह्यातील १७ साखर कारखान्यांकडे १५ कोटी रुपये थकीत आहेत. या थकीत येण्याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. सध्या खरीप पेरणीसाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज असूनही त्याकडे कारखानदारांनी दुर्लक्ष केल्याबद्दल शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

साखरेचे दरही वाढलेसाखर निर्यातीवरील बंधणे हटविल्याने साखरेच्या भावात वाढ झाली आहे. निर्यात खुली झाल्याने घाऊक बाजारात साखरेची जोरदार खरेदी झाली. त्यामुळे साखरेच्या भावात क्विंटलमागे ३० ते ४० रुपयांची वाढ दिसून आली. मध्यम प्रकारच्या (एम-३०) साखरेचे भाव क्विंटलमागे ३० ते ३९ रुपयांनी वाढले. बुधवारी ३००२ ते ३१२१ रुपये प्रतिक्विंटल या पातळीवर असणारे एम-३० साखरेचे भाव गुरुवारी ३०४१ ते ३१५१ रुपये प्रतिक्विंटल झाले.

राजू शेट्टींची तक्रार एफआरपीहून अधिकच रक्कम असल्यामुळे साखर आयुक्त यांच्याकडून कारखाना व्यवस्थापनाने परवानगी घेतली पाहिजे. मात्र, कारखान्यांनी अधिकचे पैसे देण्याबाबत कोणतीच भूमिका घेतली नाही. याबद्दल साखर आयुक्तांकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी तक्रार केली आहे. आठ दिवसांत निर्णय न झाल्यास आंदोलन करणार, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटना कार्याध्यक्ष संदीप राजोबा यांनी दिला.

अधिक वाचा: White Grub Management हुमणी नियंत्रणाचे कमी खर्चातील सोपे उपाय कोणते?

टॅग्स :साखर कारखानेऊसशेतकरीसांगलीराजू शेट्टीस्वाभिमानी शेतकरी संघटनाशेती