पुणे : राज्यातील गाळप हंगाम संपून एक ते दीड महिना ओलांडला तरीही राज्यातील अनेक साखर कारखान्यांकडे एफआरपीची रक्कम थकीत असल्याची माहिती समोर आली आहे. साखर आयुक्तालयाच्या १५ जून रोजीच्या एफआरपी अहवालानुसार राज्यातील जवळपास २० ते २२ टक्के साखर कारखान्यांकडे एफआरपीची रक्कम थकीत आहे.
दरम्यान, यंदा कमी पावसामुळे साखर गाळप हंगाम खूप कमी दिवस चालेल अशी शक्यता होती पण तसे घडले नाही. नोव्हेंबर अखेर पडलेल्या अवकाळी पावसामुळे ऊस पिकाला फायदा झाला, परिणामी उसाचे आणि साखरेचे उत्पादन वाढले. त्यामुळे मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये जरी देशात साखरेचे उत्पादन घटले असले तरी मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये राज्यातील साखर उत्पादन वाढले आहे.
यंदाचा हंगाम हा फेब्रुवारीपर्यंत चालण्याची चिन्हे असताना हा हंगाम १५ मे रोजीपर्यंत चालला. यामध्ये १ हजार ७५ लाख मेट्रीक टन उसाचे गाळप झाले असून १ हजार १०० लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. हे उत्पादन मागच्या वर्षीच्या तुलनेत जास्त असून त्यासाठी तोडणी आणि वाहतूक खर्च वजा जाता ३६ हजार ६०५ कोटी रूपये कारखान्यांनी शेतकऱ्यांना देणे अपेक्षित होते. पण त्यापैकी ३६ हजार २४७ कोटी रूपये कारखान्यांनी शेतकऱ्यांना दिले आहेत.
त्यामुळे कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे अजून ३५८ कोटी रूपये बाकी असून शेतकऱ्यांनी या रक्कमेची प्रतीक्षा आहे. एकूण एफआरपीच्या रक्कमेपैकी ९९ टक्के रक्कम जरी शेतकऱ्यांना मिळाली असली तरी २०७ साखर कारखान्यांपैकी केवळ १६६ साखर कारखान्यांनीच एफआरपीची संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांना दिली आहे. तर ४१ साखर कारखान्यांकडे एफआरपीची रक्कम बाकी असून साखर आयुक्तालयाने ७ साखर कारखान्यांवर आरआरसीची कारवाई केली आहे.