राजाराम लोंढे
कोल्हापूर : एका बाजूला शासकीय योजनांचा पाऊस सुरू असताना दुसऱ्या बाजूला शेतीमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. गेल्या पाच वर्षांत शेतीमालाच्या उत्पादन खर्चात दुप्पट वाढ झाली, मात्र दरात घाटाच सुरू आहे.
सोयाबीनचा २०२०ला प्रतिक्विंटल ६ हजार रुपये भाव होता, तो आता ४,२०० रुपयांवर आला आहे. उसाच्या एफआरपीच्या बेसमध्ये प्रतिटन ५५ रुपयांची वाढ झाली असली तरी हे पैसे तोडणी व वाहतूकदारांनाच शेतकऱ्यांच्या हाती उसाचा पालाच राहिला आहे.
गेल्या दोन वर्षांपासून सोयाबीनने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीनची विक्री करावी लागत आहे. यंदा शासनाने सोयाबीनचा हमीभाव ४८९२ रुपये प्रतिक्विंटल केला असला तरी हमीभाव केंद्राचे निकष पाहून शेतकरी पाठ फिरवत आहे.
सध्या बाजारात सरासरी ४,२५० रुपयांना विक्री करावी लागत आहे. ऊस उत्पादकांची यापेक्षा वेगळी अवस्था नाही. शासनाने एकीकडे एफआरपीमध्ये वाढ करत असताना दुसरीकडे ऊसतोडणी व वाहतूक दरात वाढ केल्याने वाढलेल्या एफआरपीचे पैसे तिथेच मुरले.
गेल्या पाच वर्षांत एफआरपीमध्ये सरासरी प्रतिटन ५५ रुपयांची वाढ झाली, पण ९.५० टक्क्यांचा बेस १० टक्के करून शासनाने शेतकऱ्यांच्या वाटीतील पुन्हा कारखानदारांच्या ताटात दिले.
मग सांगा शेती कशी करायची?
मशागतीत वाढ : १०० टक्के
बियाण्यांच्या दरातील वाढ : ४० टक्के
रासायनिक खतांच्या किमती : १२० टक्के
कीटकनाशकांच्या दरात वाढ : ४० टक्के
तणनाशक कितीने महागले : ६५ टक्के
मजुरीमध्ये झालेली वाढ : १०० टक्के
वीज व पाणी बिलातील वाढ : ५० टक्के
पाच वर्षांत उसाच्या एफआरपीत झालेली वाढ
हंगाम - प्रतिटन वाढ
२०२०-२१ - २८५
२०२१-२२ - २९०
२०२२-२३ - ३०५
२०२३-२४ - ३१५
२०२४-२५ - ३४०