अरुण बारसकरसोलापूर : वर्षभर जोपासलेल्या उसातून चार पैसे मिळतील अशा अपेक्षेने ऊस घातला खरा; मात्र जिल्ह्यातील सहा साखर कारखान्यांनी यावर्षीचा गाळप हंगाम तोंडावर आला तरी मागील हंगामाचे पैसे दिले नाहीत.
साखर आयुक्तांताकडील तक्त्यात सहा कारखाने थकबाकीत दिसत असले तरी कागदावर एफआरपी पूर्ण दाखविलेल्या अनेक कारखान्यांकडे ऊसउत्पादक बिलांसाठी चकरा मारत आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी मागील वर्षी राज्यात सर्वाधिक गाळप केले होते. गाळप हंगाम घेतलेल्या साखर कारखान्यांची संख्याही सर्वाधिक ३७ इतकी होती. गाळप घेतलेल्या ३७ पैकी करमाळ्याचा आदिनाथने केवळ ६० हजार मेट्रिक टन ऊस गाळप केला होता.
इतर ३६ कारखान्यांनी मात्र मिळेल तेवढ्या उसाचे गाळप केले आहे; मात्र ऊसउत्पादकांचे पैसे मात्र वेळच्या वेळी देणारे कारखाने कमीच आहेत. जवळपास मार्च महिन्यात जिल्ह्याचा गाळप हंगाम आटोपला.
कारखाने बंद होऊन पाच ते सहा महिन्यांचा कालावधी लोटला; मात्र साखर कारखाने शेतकऱ्यांचे पैसे द्यायला तयार नाहीत.
कागदोपत्री सहा साखर कारखान्यांकडे ऊस उत्पादकांचे पैसे असल्याचे दिसत आहे; मात्र इतर कारखान्यांनीही संपूर्ण शेतकऱ्यांचे पैसे दिले नाहीत; मात्र १०० टक्के एफआरपी दिल्याचे दाखविले आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांतील साखर कारखान्यांनी ऊस उत्पादकांचे संपूर्ण पैसे दिले; मात्र सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे ४० कोटी अडकले आहेत.
या कारखान्यांकडे थकबाकी१) मातोश्री लक्ष्मी शुगर - १४ कोटी ५५ लाख२) भीमा सहकारी - १० कोटी३) जयहिंद शुगर - ८ कोटी४) विठ्ठल रिफायनरी, पांडे करमाळा - ४ कोटी २६ लाख५) सिद्धेश्वर सोलापूर - २ कोटी६) आदिनाथ करमाळा - ६३ लाख रुपये
अशी केली हातचलाखी- समजा एखाद्या कारखान्याची एफआरपी २१०० रुपये असेल व या कारखान्याचे गाळप एक लाख मेट्रिक टन झाले असेल तर हा साखर कारखाना 'एफआरपी' प्रमाणे शेतकऱ्यांचे २१ कोटी देणे लागतो.- कायद्यानुसार एफआरपी देणे कारखान्याला बंधनकारक आहे; मात्र जिल्ह्यातील बहुतेक साखर कारखान्यांनी प्रतिटन २७०० रुपये दर जाहीर केल होता.- गाळपाच्या सुरुवातीला प्रत्येक कारखान्याने २७०० रुपयांनी ऊसउत्पादकांच्या खात्यावर जमा केले. शेवटी शेवटी झालेल्या गाळपाचे पैसे दिलेच नाहीत.- २१०० रुपयांऐवजी २७०० रुपयांचा भाव दिल्याने एकूण गाळप गुणिले एफआरपीनुसार २१०० प्रमाणे हिशेब सादर केला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे देणे असले तरी कागदोपत्री देणे दिसत नाही.