स.सो. खंडाळकर
मराठवाड्यात गेल्यावर्षी कमी पर्जन्यमानामुळे उसाचे क्षेत्र घटण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मागीलवर्षी पाऊस कमी झाल्यामुळे यंदा मराठवाड्यात साखरेचे उत्पादन घटणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
छत्रपती संभाजीनगरातील प्रादेशिक सहसंचालक साखर कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या सहा जिल्ह्यांतील साखर कारखान्यांमधून यंदा ८५ ते ९० लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन होईल. २०२३-२४ या वर्षात हे उत्पादन ९८ लाख ३३ हजार ४६२ मेट्रिक टन इतके झाले होते. २०२४-२५ या वर्षात ते घटेल.
छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड हे मराठवाड्यातील, तर जळगाव, धुळे आणि नंदुरबार या उत्तर महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांचा समावेश छत्रपती संभाजीनगर येथील प्रादेशिक सहसंचालक साखर कार्यालयांतर्गत होतो. सदर कार्यालय हे संभाजीनगरमध्ये क्रांतीचौक या भागात आहे.
२०२३-२४ या साली एकूण गाळप ९८ लाख ३३ हजार ४६२ मेट्रिक टन झाले होते व साखरेचे उत्पादन ८८ लाख २८ हजार ५४६ क्विंटल इतके झाले होते. यावर्षी या सहा जिल्ह्यांत २३ साखर कारखाने चालू होते.
उसाअभावी मुक्ताईनगर येथील साखर कारखाना सुरू होण्याची शक्यता नाही. कारण या कारखान्याने तसा निर्णय जाहीरच करून टाकला आहे. मात्र, वैजापूर तालुक्यातील महालगावचा पंचगंगा कारखाना नव्याने सुरू होणार आहे.
बीड जिल्ह्यातील राजुरी येथील कारखानाही सुरू होण्याची शक्यता कमी आहे. २०२३-२४ यावर्षी कारखान्यांचे गाळप एप्रिलपर्यंत सुरू राहिले. २०२४-२५ मध्ये फेब्रुवारी- मार्चमध्येच हे कारखाने बंद होण्याची चिन्हे आहेत.
यावर्षी उसाचे क्षेत्र वाढू शकते
२०२४-२५ मध्ये पाऊस चांगला आहे. त्यामुळे उसाचे क्षेत्र वाढू शकेल, असा अंदाज आहे. उत्पादित झालेल्या उसापैकी २० टक्के ऊस गुहाळासाठी व अन्य भागांतील कारखान्यांसाठीसुद्धा जातो.
ऊस क्षेत्र व एकूण ऊस उत्पादन
२०२३-२४ मधील ऊस लागवड झालेले व गाळप हंगाम २०२४-२५ करिता उपलब्ध होणारे ऊस क्षेत्र हेक्टरमध्ये व एकूण ऊस उत्पादन मेट्रिक टनमध्ये
जिल्हा | ऊस क्षेत्र | ऊस उत्पादन |
छत्रपती संभाजीनगर | ३१७०२.२३ | २६८३४४२.२५ |
जालना | ३१६९४.१० | २७१५२३४.०० |
बीड | ४९४४५.३५ | ३८०७०७८.५० |
जळगाव | २०६१२.६१ | १५२८१४९.५० |
धुळे | ५७४०,०० | ५०५३३०,०० |
नंदुरबार | २०६१२.६१ | १५२८१४९.५० |