सुनील डोळसे
जालना-भोकरदन महामार्गावरील मानदेऊळगाव, पिरपिंपळगाव परिसरात ऑक्टोबर-नोव्हेंबर हिट अन् हिवाळ्याची चाहूल लागताच मोठ्या प्रमाणात शीतपेय व रसवंतिगृहांची दुकाने थाटली आहेत. त्यामुळे सध्या सर्वत्र घुंगरांचा आवाज कानी पडू लागला आहे.
मात्र, जोपर्यंत उन्हाचे चटके जाणवत नाहीत, तोपर्यंत ग्राहकही शीतपेय घेणार नाही, असे दिसून येते. परंतु, ऊस आरोग्यासाठी लाभदायी असल्यामुळे जागोजागी चरख्याच्या माध्यमातून ग्राहकांच्या मागणीनुसार शुद्ध उसाचा रस काढून दिला जात असल्याचे रसवंतीचालक दिगंबर बरकासे, योगेश कोल्हे, गणेश कोल्हे, शेषनारायण कोल्हे, पांडुरंग बनसोडे यांनी यावेळी सांगितले.
थंडीपूर्वीच नागरिक रसाचा आस्वाद घेत आहेत. उन्हाळ्याची तीव्रता अधिक जाणवल्यानंतर आपोआपच नागरिक शीतपेये व रसवंतीगृहांत जाणार आहेत. त्यामुळे विक्रेत्यांनाही सुगीचे दिवस येतील.
विविध आजारांवर उसाचा रस गुणकारी
• 'अहो काका, ओं भैया, एक उसाचा रस घ्या' हे वाक्य विविध रसवंती दुकानांत ऐकायला येऊ लागले आहे. ताजा आणि थंडगार उसाचा रस पिण्याचा आनंद काही वेगळाच असतो.
• उसाचा रस नैसर्गिक पेय आहे. उसाचा रस अनेक आजारांपासून दूर ठेवतो. त्यामुळे अनेकजण ताजा उसाचा रस घेणे पसंत करतात.
सर्वांचा उन्हाळ्यामध्ये आइस्क्रीमवर भर
• उन्हाची तीव्रता वाढल्यानंतर मार्च-एप्रिल महिन्यात नागरिक आइसक्रीम खाण्यावर अधिक भर देतात. सध्या पावसाळा संपून हिवाळ्याची चाहूल लागली आहे.
• त्यामुळे नागरिक आइसक्रीम चाखण्याचा आनंद घेताना दिसत नाही. तरीदेखील बाजारात काजू, पिस्ता, केशर, व्हॅनिला, हिरामोती, गुलकंद, पानमसाला, अमेरिकन ड्रायफ्रूट यांसारखे आइसक्रीम उपलब्ध आहेत. हे आइसक्रीम १० ते ५० रुपयांना बाजारात उपलब्ध आहेत.
ताक, लिंबू सरबताची दुकाने थाटणार
• आता हिवाळ्याची चाहूल लागली आहे. तरीदेखील अनेक ठिकाणी मठ्ठा, ताक, लिंबू सरबत मागणीनुसार दिले जात आहे.
• भर हिवाळ्यातही अनेक लोक पाणी पिण्याऐवजी लिबू सरबतला पसंती देतात. उन्हाळ्यात तर रस्त्यात जागोजागी मठ्ठा व जलजिऱ्याच्या गाड्या लावलेल्या दिसतात.
रुग्णालय परिसरात ज्यूसला मागणी
• आजही शहरातील रुग्णालय परिसरात ज्यूसची दुकाने कायमस्वरूपी थाटलेली असतात. या ठिकाणी अननस, स्ट्रॉबेरी, चिकू, सफरचंद, संत्री आदी फळांच्या ज्यूसला सर्वाधिक मागणी असते.
• हे सर्व प्रकारचे ज्यूस साधारणपणे २० ते ६० रुपये किमतीपर्यंत उपलब्ध आहेत. त्यामुळे अनेकजण या सर्वांचे मिक्स ज्यूस घेण्यावर भर देतात.