Join us

ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात लावलेल्या उसाची अजून तोडणी होईना, काय आहे अडचण?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 3:00 PM

ऊस तोडणीसाठी २४ हार्वेस्टर असूनही ऊस अजून फडात कशाने?

एका टोळीला पाच टन ऊस तोडण्यासाठी दिवसभर लागते, तर हार्वेस्टरद्वारे एका तासात २० मे. टन उसाची तोडणी केली जाते. असे नांदेड जिल्ह्यात २४ हार्वेस्टर आहेत; पण असे असले तरी ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात लागवड झालेल्या उसाची अद्यापही तोडणी झालेली नसल्याने ऊस उत्पादक शेतकरी त्रस्त झाले आहेत.नांदेड जिल्ह्यात यंदा नांदेड विभागात उसाची हजारो हेक्टरवर लागवड झालेली आहे. ऊस लागवड करून १५ ते १६ महिन्यांचा कालावधी झाला तरी अजूनही शेतकऱ्यांच्या उसाची तोडणी झालेली नाही. एक कारखाना आपल्या क्षेत्रातील ऊस दुसऱ्या कारखान्याला नेण्यास मनाई करत असल्याने तोडणीला विलंब होत असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठी घट होणार आहे.

कारखान्यांनी उसाला पहिली उचल २५०० रुपये जाहीर केलेली आहे, पण उसाची तोडणीच होत नसल्याने पैसे हातात लागवडीपासून दोन वर्षानंतर मिळणार काय, असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

दुसऱ्या कारखान्याला ऊस देऊ नका...ऊस वेळेत गेला तर शेतकऱ्यांना पैसे वेळेवर कामाला येतील. पण, ज्या शेतकऱ्यांनी ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात उसाची लागवड केलेली आहे, अशा शेतकऱ्यांचा ऊसही शेतातच तोडणीअभावी पडून आहे. ऊसतोडणी किमान एक महिना उशिराने सुरू झाली तसेच ऊस तोडणीसाठी टोळ्यांची कमरता असल्याने आणि एकाचवेळी अनेक शेतकऱ्यांचा ऊसतोडणीला आल्याने अजूनही बहुतांश शेतकऱ्यांचा ऊस कारखान्यांनी नेलाच नाही. त्यामुळे शेतकऱ्यासमोर आर्थिक पेच निर्माण झाला आहे.

शेजारील जिल्ह्यातील काही कारखाने व गूळ कारखाने नगदी पैसे देऊन ऊस नेण्यास तयार आहेत; पण आमच्या कार्यक्षेत्रातला ऊस नेऊ नका, अशी तंबी कारखाना व्यवस्थापकाकडून दिली जात असल्याने शेतकरी दुहेरी पेचात पडला आहे.

ऊस टोळ्यांची कमतरता

जिल्ह्यासह विभागात ऊस तोडणाऱ्या टोळ्यांची कमतरता असल्याने ऊसतोडणीसाठी येऊन सहा महिने लोटले तरी अद्याप बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतात ऊस टोळ्या पोहोचल्याच नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.

टॅग्स :ऊससाखर कारखानेशेतकरीनांदेड