सोमेश्वरनगर : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगाम २०२४-२५ मध्ये गाळप झालेल्या उसाला प्रतिटन २८०० रुपये पहिली उचल देण्याचा निर्णय घेतला आहे.
३१ डिसेंबर २०२४ पूर्वी गाळप झालेल्या उसाची रक्कम १० जानेवारी रोजी सभासदांना अदा केली जाईल, अशी माहिती या कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली.
सोमेश्वर साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची मासिक बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत पहिली उचल प्रतिटन २८०० रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. एफआरपीनुसार प्रतिटन २६०५ रुपये इतका दर बसत आहे.
यामध्ये प्रतिटन १९५ रुपये अधिकचे दिले जाणार असल्याचं पुरुषोत्तम जगताप यांनी सांगितले. ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत गाळप झालेल्या उसाची रक्कम १० जानेवारी रोजी अदा केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सोमेश्वर कारखान्याने ऊस दर जाहीर करत पुणे जिल्ह्यातील सहकार कारखानदारांतील ऊस दराची कोंडी फोडली आहे, गत हंगामात सोमेश्वर कारखान्याने ३५७१ रुपये असा उच्चांकी दर दिला होता. तसेच एफआरपीपेक्षा ६९७ रुपये जास्तीचा दर दिला होता.
एफआरपीच्या नव्या सूत्रानुसार १०.२५% उताऱ्यानुसार एफआरपीचा पहिला हप्ता दिला जातो. तर हंगाम संपल्यानंतर अंतिम साखर उतारा निश्चित झाल्यावर एफआरपीची अंतिम रक्कम निश्चित होते.
हंगाम संपल्यावर पंधरा दिवसांत एफआरपीचा उर्वरित फरक देणे बंधनकारक आहे. यानुसार 'सोमेश्वर'ची अंतिम एफआरपी ३१२० ते ३१५० च्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे.
उर्वरित ३२० ते ३५० रुपये हंगाम संपल्यावर दिले जाणार आहेत. खोडवा आणि सुरू उसासाठी १५० रुपये प्रतिटन अनुदान कारखान्याने जाहीर केले आहे.
छत्रपती सहकारी साखर कारखान्याकडून पहिला हप्ता जाहीर
■ भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना उसाचा पहिला हप्ता प्रतिटन रुपये २,८०० रुपये जाहीर करण्यात आला आहे. हा पहिला हप्ता लवकरच ऊसउत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येणार आहे. या हंगामातील अंतिम साखर उतारा व साखरेचे दर विचारात घेऊन अंतिम ऊस दर देण्यात येणार असल्याचे कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे, उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी सांगितले.
■ यंदा कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ८ लाख मे.टन ऊस गळितासाठी उपलब्ध असून कार्यक्षेत्राबाहेरील २ लाख मे.टन असे एकूण १० लाख मे.टन उसाचे गाळप करण्याचे संचालक मंडळाने उद्दिष्ट ठरविले आहे. आत्तापर्यंत ३ लाख ६ हजार ५७२ मे. टन उसाचे गाळप होऊन सरासरी १० टक्के रिकव्हरीने २ लाख ९७ हजार ५०० क्विंटल इतके साखरेचे उत्पादन झाले आहे. तसेच सहवीजनिर्मिती प्रकल्पातून १.५५३,७०० युनिट्स वीजनिर्मिती आली असून त्यापैकी अंतर्गत वापरासाठीची वीज वजा जाता ९९,९४,००० युनिट्स वीज निर्यात आली आहे. चालू वर्षी कारखान्याने १० लाख मे.टन गाळप गृहीत धरून ऊसतोडणी वाहतूक यंत्रणेस अॅडव्हान्स वाटप केलेला आहे.
सध्या पहिल्या उचलीपोटी टनाला २८०० रुपये देत आहोत. कारखाना बंद आल्यावर एफआरपी ३२० ते ३५० रुपये उर्वरित फरक दिला जाणार आहे. दरवर्षीप्रमाणे सोमेश्वर कारखाना राज्यातील इतर कारखान्यांच्या तुलनेत अंतिम दराचाबत कुठेही कमी पडणार नाही. उच्चांकी दराची परंपरा कायम राखली जाणार आहे त्यामुळे सभासदांनी सोमेश्वर कारखान्यालाच ऊस घालावा. - पुरुषोत्तम जगताप. अध्यक्ष, सोमेश्वर सहकारी साखर कारखाना