Pune : राज्यातील साखर गाळप हंगाम सुरू होऊन एक महिना उलटला आहे. तरीही अजून गाळप हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू झालेला नाही. साखर आयुक्तालयाकडून आत्तापर्यंत बहुतांश साखर कारखान्यांना गाळपाचे परवाने गेलेले आहेत पण अजूनही राज्यातील जवळपास २५ टक्के साखर कारखाने सुरू झालेले नाहीत.
दरम्यान, साखर आयुक्तालयाने दिलेल्या माहितीनुसार, कालपर्यंत म्हणजे ९ डिसेंबर २०२४ पर्यंत राज्यातील १५६ साखर कारखान्यांनी आपले गाळप सुरू केले होते. त्यातील ७९ साखर कारखाने सहकारी तर ७७ साखर कारखाने खाजगी आहेत. कालपर्यंत १४६ लाख मेट्रीक टन उसाचे गाळप झाले आहे. तर या उसातून ११५ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.
त्याबरोबरच राज्यातील सरासरी साखर उतारा हा ७.८९ एवढा आहे. हा साखर उतारा एफआरपीच्या नियमानुसार कमी असून केंद्र सरकारने १०.२५ टक्के साखर उताऱ्यासाठी ३ हजार ४०० रूपये प्रतीटन एवढा दर जाहीर केला आहे. पण साखर उतारा कमी आल्यामुळे शेतकऱ्यांना कमी दर मिळणार आहे.
साखर उतारा कमी का?
यंदा मान्सूनचा पाऊस साधारण एक महिना उशिरापर्यंत चालला. त्यामुळे अनेक शेतामध्ये पाणी होते. गाळप हंगाम सुरू होताना अनेक उसामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त आणि साखरेचे प्रमाण कमी होते त्यामुळे पहिल्या एका महिन्यामध्ये गाळपासाठी गेलेल्या उसाचा साखर उतारा कमी आला आहे.