भेंडा : नगर जिल्ह्यातील बहुतांशी सहकारी साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू झाले आहेत. त्यामुळे ऊसतोडणी मजूर कारखाना कार्यस्थळावर दाखल झाले आहेत.
भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर कारखान्याचे ७० हजार मेट्रिक टन उसाचे गाळप झाले आहे. मुळा कारखाना दोन दिवसांत सुरू होईल. वरखेड कारखाना सुरू होणार आहे. दरम्यान, कारखाने सुरू झाले असले तरी अद्याप ऊस दर जाहीर झाला नाही.
त्यामुळे शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे ती कोणता कारखाना किती ऊस दर देणार त्याची जिल्ह्यातील इतर कारखान्यांचे हंगाम सुरू झाल्याने नेवासा तालुक्यात प्रवरानगर, संगमनेर, दौंड शुगर, अगस्ती, पराग, पंचगंगा, गंगामाई, अशोकनगर या कारखान्यांच्या ऊसतोडणी कामगारांच्या टोळ्या दाखल झालेल्या आहेत.
पुढील पंधरवड्यात आणखी काही कारखान्यांच्या ऊसतोडणी कामगारांच्या टोळ्या येतील. शिवाय ऊसतोडणी यंत्राच्या साहाय्यानेही ऊसतोडणीचे काम सुरू झाले आहे. शेती मशागत, मजुरी व खातांचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने यंदा साखर कारखान्यांना यंदा चांगला ऊसदर द्यावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
जो जादा भाव देणार त्यालाच ऊस देणार
नेवासा तालुका उसाचे आगार आहे. यामुळे जिल्ह्यातील इतर कारखाने येथील ऊस मिळविण्यासाठी स्पर्धा करतात. जो कारखाना उसाला जादा दर देऊन लवकर ऊसतोड करणार, त्या कारखान्याला ऊस देण्याचा कल ऊस उत्पादक शेतकयांचा असतो. लवकर ऊस तुटून गेला तर गहू किंवा हरभऱ्याचे पीक घेता येते. म्हणून लवकर ऊसतोडणीस शेतकरी प्राधान्य देतात.