पुणे : राज्यातील गळीत हंगाम सध्या शेवटच्या टप्प्यात असून येणाऱ्या काही दिवसात हंगामाची सांगता होणार आहे. पावसाच्या कमतरतेमुळे यंदा ऊस हंगाम कमी दिवस चालेल अशी शक्यता होती पण नोव्हेंबर अखेर पडलेल्या पावसामुळे उसाचे उत्पादन वाढले. तर हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात राज्यातील काही कारखान्यांकडे FRP ची रक्कम बाकी आहे.
दरम्यान, राज्यातील एकूण 206 साखर कारखान्यांपैकी सध्या 73 साखर कारखान्यांचे ऊस गाळप बंद झालेले आहे. तर काही कारखाने मार्च अखेरपर्यंत बंद होणार असून जवळपास 10 टक्के साखर कारखाने एप्रिलच्या मध्यापर्यंत चालणार असल्याची शक्यता आहे.
राज्यात 15 मार्च अखेरपर्यंत 927 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप झाले आहे. तर त्यासाठी 28 हजार 693 कोटी रुपये एफआरपी वाहतूक आणि तोडणी खर्चासहित शेतकऱ्यांना देय होती. तर त्यापैकी वाहतूक आणि तोडणी खर्चासहित 26 हजार 856 कोटी रुपये शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेले आहेत. 1 हजार 837 कोटी रुपये कारखान्यांकडे एफआरपी थकीत आहे. टक्केवारी मध्ये बघायचे झाले तर एकूण एफआरपीच्या रकमेपैकी 93.60% रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित करण्यात आली असून 6.40% एफआरपी देणे बाकी आहे.
दरम्यान, राज्यातील 206 साखर कारखान्यांपैकी 105 साखर कारखान्यांनी एफआरपीची पूर्णपणे रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली आहे. तर 54 साखर कारखान्यांनी 80 ते 100% पर्यंत एफआरपी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे. 34 साखर कारखान्यांनी 60 ते 80% एफआरपीची रक्कम तर 13 साखर कारखान्यांनी 60% पर्यंत एफ आरपीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली आहे तर राज्यातील 101 साखर कारखान्यांकडे एफआरपीची रक्कम बाकी आहे. त्याचबरोबर शासनाचे नियम न पाळल्यामुळे एका साखर कारखान्यात विरोधात RCCची कारवाई करण्यात आलेली आहे.
किती दिवस चालणार साखर कारखाने?
उसाचा हंगाम सध्या शेवटच्या टप्प्यात असून येत्या मार्च कर पर्यंत राज्यातील जवळपास 90% साखर कारखाने आपला गाशा गुंडाळतील अशी शक्यता आहे. तर ज्या ठिकाणी पाण्याची चांगली उपलब्धता आहे अशा भागातील साखर कारखाने एप्रिल महिन्याच्या मध्यापर्यंत चालण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
किती होईल साखरेचे उत्पादन?
केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीवर निर्बंध घातल्यामुळे साखर उत्पादनात वाढ झाली असून मागच्या वर्षीच्या तुलनेत साखर उत्पादन समाधानकारक असणार आहे.