कोपार्डे : कोल्हापूर विभागात ३० साखर कारखान्यांची धुराडी पेटली आहेत. आतापर्यंत विभागात ५ लाख ५० हजार मे.टन उसाचे गाळप केले आहे. सरासरी ८.७० टक्के साखर उताऱ्यासह ५ लाख ६० हजार क्विंटल साखरेचे उत्पादन केले.
लांबलेला पाऊस व निवडणुका यांचा विचार करून मंत्री समितीच्या शिफारशीमुळे नोव्हेंबर महिन्याच्या १५ तारखेनंतरच कारखान्याने आपले गाळप हंगाम सुरू करावेत, असे आदेश साखर आयुक्तांनी दिले होते.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऊसतोड मजुरांनी स्थलांतर करू नये यासाठी हे नियोजन केले असल्याचा शेतकरी संघटनेचा आरोप होता. १५ ऑक्टोबरला सुरू होणारे राज्यातील साखर कारखान्याचे गाळप हंगाम नोव्हेंबर महिन्यापर्यंत गती घेत होते.
पण नोव्हेंबर महिना संपत आला तरी कोल्हापूर जिल्ह्यातील २३ पैकी १५ व सांगली जिल्ह्यातील २० पैकी १५ साखर कारखान्याने आपले गाळप हंगाम सुरू केले आहेत.
कोल्हापूर विभागात परजिल्ह्यातून ऊसतोड मजूर येण्यास सुरुवात झाली आहे. डिसेंबर महिन्यानंतरच जिल्ह्यातील गाळप हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू होईल, अशी कारखानदारांच्या कडून सांगण्यात आले आहे.
हंगाम लांबणार
राज्यात १५ ऑक्टोबरला सुरू होत असे, पण परतीच्या पावसाने नोव्हेंबर महिन्यापर्यंत ठाण मांडल्याने साखर उतारा मिळणार नाही. या दृष्टिकोनातूनच मंत्री समितीने हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. त्यातच दिवाळी १ ते ४ नोव्हेंबर दरम्यान असल्याने परजिल्ह्यातील ऊसतोड मजूरही आले नाहीत.
अधिक वाचा: पहिल्या उचलबाबत पंधरा दिवसांत निर्णय घ्या अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा