Pune : ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये अनेकदा बऱ्याच समस्यांना उत्तर नसते. तर उसाच्या वेगवेगळ्या वाणांची लागवड करत असताना ८६०३२ हा वाण शेतकऱ्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे. साखर कंटेंट सर्वांत जास्त असलेला आणि त्यामुळे साखर उतारा जास्त येणारा हा उसाचा वाण आहे. पण या वाणामध्ये उसाच्या कांड्यावर चिरा पडल्याचे दिसून येते.
दरम्यान, ८६०३२ या उसाच्या वाणावर चिरा का पडतात? दुसऱ्या वाणाच्या किंवा जातीच्या उसावर चिरा का पडत नाहीत? हा रोग आहे का? यामुळे उसाचे उत्पादन घटू शकते का? यामुळे उसाची वाढ थांबते का? हा प्रश्न बऱ्याच शेतकऱ्यांना पडतो. पण उसाला चिरा पडणे हा रोग नाही. हा या वाणाचा अनुवांशिक गुणधर्म आहे.
यासोबतच या उसावर कोड फुटल्यासारखे चट्टेसुद्धा आपल्याला दिसतात. उसाच्या कांड्यावर चट्टे पडणे आणि चिरा पडणे हाही या उसाचा गुणधर्म असून यामुळे कोणत्याही प्रकारचा परिणाम उसाच्या उत्पादनावर होत नाही. या चिऱ्यामधून कोणत्याही कीड रोगाचा प्रादुर्भाव होत नाही.
सध्या ८६०३२ हा उसाचा वाण रसवंती आणि साखर कारखान्यांमध्ये प्रसिद्ध आहे. अनेक शेतकरी या उसाची लागवड करून रसवंतीसाठी देतात. तर हा ऊस गोड असल्यामुळे या उसाला डुक्करांचा त्रास सहन करावा लागतो.