- रविंद्र शिऊरकर
गेल्या दोन महिन्यांपासून राज्याच्या विविध भागात ऊसतोड कामगार घरदार सोडून झोपड्यांमध्ये आपले दिवस काढत आहे. परिस्थितीला तोंड देत दैनंदिन जीवनात आलेल्या अडचणीत हातउसने घेतलेल्या पैशांच्या बदल्यात तर काही जण गावाकडे काम नाही, दोन पैसे मिळतील या अपेक्षेने ऊस तोडणी साठी गाव सोडून परगावी ताडपत्रीच्या आडोश्यात दिवस काढत आहे.
घर सोडून चाललो आता लेकरं कोण बघणार? शांत राहतील खोड्या करणार नाही असं कोणत्याचं मुलाच्या किंवा कुणाच्याचं मुलांच्या बाबतीत घडत नाही. यास्तव लेकरांनाही सोबत घेऊन अशीच ५०० बैलगाडी आणि त्यावर असलेले १८००-२००० महिला पुरुष लेकरं अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील संजीवनी साखर कारखाना परिसरात ऊस तोडणीसाठी तळ ठोकून राहत आहेत.
यातील बहुतांश परिवार हे जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, नाशिकमधील नांदगाव, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड या परिसरातील असून यातील बहुतांशी शेतकऱ्यांनी आपल्या अगदी दोनचार महिन्यांच्या लेकरांपासून ते १४-१५ वर्षांच्या मुलांना देखील सोबत आणले आहे. त्यांचे शिक्षण बंद असून साखर शाळा त्यांना शिकवतात का? याबाबत जेव्हा लोकमत ऍग्रो प्रतिनिधींनी त्यांच्याशी सवांद साधला तेव्हा शेतकऱ्यांनी नाव न घेण्याच्या अटींवर सांगितलं की, 'आम्हाला इकडे येऊन दोन महिने झाले आहे साखर शाळा गेल्या महिनाभरापूर्वी सुरु झाल्या असून त्यातही शिक्षक दररोज येत नाहीत. आले तरी फक्त एक तास थांबतात. आम्हीचं मुलांना तिकडे पाठवतो ते फक्त येतात व जातात. आम्ही अडाणी आहोत पण लेकरं शिकावी असं लै वाटतं पण काय करणारं...' असं म्हणतं एका आईने ऊस तोड कामगारांच्या मुलांना निवासी शाळा असायला हव्यात, ही लेकरं आमच्या सोबत रानावनात फिरतात यात दोन वेळेचे जेमतेम जेवण मिळते त्यामुळे आजारी पडतात पण घरी कोण यांना बघणार त्यामुळे घेऊन फिरावं लागत असल्याचं सांगितलं.
राज्याच्या विविध भागात थाटात उभे असलेले कारखाने, त्यातून निघणारी गोड साखर कित्येक स्वप्नांना व भावी होतकरू पिढीला कडू व्यथा देत तयार होत असते. यात कित्येक परिवार आणि कित्येक पिढ्या गरज लागल्यावर मुकादम कडून 'उचल'च्या नावाखाली हातउसने घेतलेल्या पैश्यांच्या जाळ्यात भरडल्या गेल्या असून त्यासोबत कित्येक स्वप्न देखील ऊसाच्या गोडव्यात झाकले गेले आहे. ज्याबाबत न कारखाना काही करू शकला न शासन!
काही सामाजिक संस्था, जिल्हा परिषद व साखर कारखाने यातून प्रत्येक कारखान्यावर साखर शाळा चालवल्या जातात ज्यांना प्रसिद्धी देत श्रेय देखील लुटले जाते मात्र वास्तव्यात किती अंधार आहे... शाळेच्या या चार भिंतीत उजेड येतो का हे बघायला मात्र कोणीचं फिरकत नाही.