Join us

Summer Crop: उन्हाळी हंगामातील 'ही' पिके करतील का मालामाल? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 14:06 IST

Summer Crop : उन्हाच्या झळा आणि चारा उपलब्ध नसल्याचा परिणाम थेट जनावरांच्या आरोग्यावर होतो. त्यामुळे उन्हाळी पिकांबरोबर चारा पिकांचीही व्यवस्था या उद्देशाने शेतकरी आता उन्हाळी पिकांकडे (Summer Crop) लागवड करताना दिसत आहेत.

रब्बी हंगामातील पिके आता काढणीला आली आहेत त्यामुळे येत्या काळात आता शेतकऱ्यांचा कल उन्हाळी पीक (Summer Crop) घेण्याकडे वाढताना दिसत आहे. आता उन्हाळी हंगामातील पिकांच्या कामात शेतकरी गुंताना दिसत आहेत.  

हिंगोली जिल्ह्यात खरीप, रब्बी हंगामासह उन्हाळी पीक (Summer Crop) घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्याही मोठी आहे. आतापर्यंत ११ हजार ४२६ हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी पिकांची पेरणी झाली आहे. 

यात भुईमूग, ज्वारी, तीळ पिकाला (Groundnut, Sorghum, Sesame Crop) जास्त पसंती असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ही पिके शेतकऱ्यांना मालामाल करणार का? याकडे लक्ष लागले आहे.

जिल्ह्यात खरीप हंगामात ३ लाख ८२ हजार ९०२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. तर रब्बी हंगामात १ लाख ४४ हजार हेक्टर क्षेत्रापेक्षा जास्त पेरणी झाली होती. खरीप हंगामात अतिवृष्टी झाल्याने

रब्बी हंगामावर शेतकऱ्यांची आशा होती. रब्बी हंगामाने शेतकऱ्यांना चांगली साथ दिली. हरभरा, गहू पिकाची काढणी सुरू आहे. आता एका वर्षात तीन पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. त्यामुळेच सिंचनाची सुविधा उपलब्ध असलेले शेतकरी उन्हाळी पेरणीच्या कामात गुंतले आहेत.

आतापर्यंत तब्बल ११ हजार ४२६ हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी पिकाचा पेरा झाला आहे. यात उन्हाळी ज्वारीसह, भुईमूग, तीळ पिकाला सर्वाधिक पसंती असल्याचे दिसून येत आहे.

उन्हाच्या झळा आणि चारा उपलब्ध नसल्याचा परिणाम थेट जनावरांच्या आरोग्यावर होतो. त्यामुळे उन्हाळी पिकांबरोबर चारा पिकांचीही व्यवस्था या उद्देशाने शेतकरी आता उन्हाळी पिकांकडे लागवड करताना दिसत आहेत. (Shortage of fodder)

मूग, उडीद अन् सोयाबीन

यंदा उन्हाळी हंगामात मूग, उडीद अन् सोयाबीन पिकालाही पसंती दिली आहे. आगामी हंगामात पेरणीसाठी बियाणे उपलब्ध होईल, या उद्देशाने ही पेरणी केल्याचे शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे या पिकाला किती क्विंटलचा उतारा येतो याकडे लक्ष लागले आहे.

जनावरांच्या चाऱ्याची चिंता मिटणार

* खरीप व रब्बी तसेच उन्हाळी हंगामातही ज्वारीची पेरणी केली जात आहे. मका पीकही तिन्ही हंगामात घेण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत. त्यामुळे यातून चारा उपलब्ध होणार आहे. (Shortage of fodder)

* यंदाच्या उन्हाळी हंगामातही आतापर्यंत ज्वारी १ हजार ४०६ हेक्टर, मका पिकाची १५९ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

७ हजार ४५९ हेक्टरवर भुईमूग पीक

* बाजारात शेंगदाण्याचा भाव १२० ते १५० रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ७ हजार ४५९ हेक्टर क्षेत्रावर भुईमूग पीक घेतले आहे. यातून जास्तीत जास्त उत्पादन काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

* बाजारात भुईमुगाचा भाव असाच राहिला तर हे पीक शेतकऱ्यांना मालामाल करू शकते.

उन्हाळी हंगामातील पेरणी

पीक      हेक्टर
मका      १५९
ज्वारी     १,४०६
मूग         ४८३
उडीद       ०७
भुईमूग      ७,४४९
सूर्यफूल      ६५
तीळ          १,२३२
सोयाबीन      ९६

हे ही वाचा सविस्तर : Farmer story : हळदीतून भगवानरावांनी केली सोनेरी किमया; मिळाले लाखांचे उत्पन्न

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीरब्बी हंगामरब्बीशेतीज्वारी