बुलढाणा जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी यावर्षी शेतकऱ्यांनी भुईमूग पिकाला पसंती दिली. आता भुईमूग पिकाच्या काढणीला सुरुवात होत आाहे. मात्र, यातून अपेक्षित खर्चही निघत नसल्याचे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
भुईमूग बियाणे दर्जेदार निघाल्याने भुईमूग पिकाची पेरणी सुद्धा चांगली बहरली होती. यावर्षी भुईमूग शेंगांना चांगला भाव मिळेल म्हणून शेतकऱ्यांनी भुईमूग पिकावर जास्त खर्चही केला होता. मात्र, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल महिन्यात मध्यरात्री गारपीट, वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाल्यामुळे व धुक्यामुळे भुईमूग पिकावर बुरशीनाशक रोगाचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे शेतकरी मेटाकटीस आला आहे.
रोगराई वाढल्याने खर्च वाढला!
अवकाळी पावसामुळे भुईमूग पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पिकाच्या लागवडीचा खर्चही वाढला. पिकावर विविध संकटे व रोगराई येत असल्याने शेतकऱ्यांनी तीन-चार वेळा फवारणी केली. परंतु तोही खर्च निघेना. त्यामुळे बियाणे, खते पुन्हा-पुन्हा विकत घेण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत आहे. परिणामी, पिकाच्या लागवडीचा खर्च वाढला आहे.
फवारणी खर्चही जास्त
भुईमूग पिकावर अवकाळी व धुक्यामुळे रोगांचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी फवारणीवर खर्चही जास्त प्रमाणात केला. परंतु त्या फवारणीचा काही परिणाम झाला नाही. आता भुईमूग काढताना पिकाला भावही मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत आहे.
६०००-६२०० पर्यंत दर
■ यावर्षी भुईमूग पिकाला ६००० ते ६२०० रुपये क्विंटलपर्यंत दर मिळत आहे. मजूर वर्गाकडून जिल्ह्यात एकरी १२ ते १३ हजार रुपये मजुरी घेण्यात येत आहे. त्यामुळे मजुरीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
■ भुईमूग पिकाचे उत्पादन एकरी ७ क्विंटल, कुठे ८ क्विंटल, तर कुठे १० क्विंटलपर्यंत होत आहे. यावर्षी उत्पादनात ही मोठी घट होत असल्यामुळे देऊळगाव कुंडपाळसह जिल्ह्यातील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे.
हेही वाचा - शेळीपालनातून आधुनिक स्मार्ट पद्धतीने अधिकचा नफा मिळविण्याचे तीन मार्ग