Join us

उन्हाळा वाढलाय! भरपूर फळं खा, पण कुठल्या फळातून काय मिळतं?

By मुक्ता सरदेशमुख | Published: March 31, 2024 4:06 PM

उष्णतेचा दाह कमी करणाऱ्या या उन्हाळी फळांमध्ये काय काय गुणधर्म आहेत?

उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. तापमान चाळीशीपार जात असताना उन्हात वेगवेगळी फळांच्या रसांसह वेगवेगळी फळं खाण्यास पसंती देत आहेत. पण कुठल्या फळातून काय काय मिळतं? चला जाणून घेऊया..

टरबूज

कलिंगड किंवा टरबूज हे उन्हाळ्यातील सर्वेात्तम फळांपैकी एक फळ आहे. ९२ टक्के पाण्याचं प्रमाण असणाऱ्या टरबूजात अनेक पोषक घटक आहेत. टरबूज, कलिंगड ही दाहक विरोधी फळं आहेत. उष्ण झळांचा दाह कमी करणारे, शरीरात थंडावा निर्माण करण्याव्यतिरिक्त यातील ॲन्टीऑक्सिडन्ट गुणधर्म अकाली वृद्धत्व टाळण्यास मदत करते.

टरबूज हे लाइकोपीन आणि व्हिटॅमिन सी सह फायटोकेमिकल्सचा उत्तम स्रोत आहे. उन्हाळ्यात हे फळ तुमच्या शरिराला हायड्रेट करते. यात व्हिटॅमिन सी, बी, ई आणि लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम व फॉस्फरस सारख्या खनिजांचा समृद्ध स्रोत आहे.

आंबा

शरिराला फायद्याच्या कॅलरींसह भरपूर फायबर, जीवनसत्व आणि अनेक खनिजांनी समृद्ध असणारा आंबा फळांचा राजा उगाच नाही. एका अभ्यासानुसार, आंब्याच्या सालीतही अशी बायोॲक्टीव संयुगे आहेत जी पेशींचे होणारे नुकसान कमी करतात. अकाली वृद्धत्व, जुनाट आजारांचा धोका कमी करण्यासही ते मदत करतात. जेंव्हा भारतात अत्यंत तीव्र उन्हाळा असतो तेंव्हा तुमच्यात ऊर्जा कमी असते. आंब्यात ही ऊर्जा भरण्याची ताकद आहे.

खरबूज

टरबूजाप्रमाणेच खरबूजही एक उत्तम उन्हाळी फळ आहे ज्यात तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता भरून काढण्याची क्षमता अधिक आहे. खरबूज व्हिटॅमिन ए, सी, पोटॅशिअम आणि मॅग्नेशियमचा उत्तम स्रोत आहे.

संत्री

संत्र्यात ८० टक्क्यांपेक्षा जास्त पाणी असते. भरपूर व्हिटॅमीन सी आणि जीवनसत्व तुम्हाला उन्हाळ्यात ताजंतवानं तर ठेवतंच पण उन्हाचा दाह कमी करण्यासही मदत करते. या उन्हाळ्यातील फळांचा आस्वाद घेण्यासाठी संत्र्याचा रस सर्वात सोपा आणि उत्तम मार्ग मानला जातो.

अननस

काटेरी आणि रसाळ फळ अशी ओळख असणारे अननस फळ व्हिटॅमिन A, B1, B2, B3, B6, C, झिंक, मॅग्नेशियम, फॉस्फरस, कॅल्शियम आणि पोटॅशियमने भरलेलं आहे. हे फळ शरीराला हायड्रेट करतात आणि उन्हाळ्याच्या हंगामात वाढू शकणाऱ्या आंबटपणाचे संतुलन राखतात.

या फळांसह नारळपाणी, केळी,द्राक्ष, अंजीर, लिंबू ही फळंही उन्हाळ्यात मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. भारतात मार्च ते जून महिने प्रचंड उष्णतेसह अंगाची लाही लाही होणारे असतात. या फळांच्या सेवनानं शरीरातील पाण्याच्या प्रमाणासह आवश्यक खनिजांचे प्रमाण संतूलित राहते.

टॅग्स :फळेआरोग्यहवामान