'पिंडी ते ब्रह्माण्डी' या न्यायानुसार बाह्य जगतात जे जे बदल घडतात. त्याप्रमाणे आपल्या शरीरातही सतत बदल घडत असतात. त्याचा प्रतिकूल किंवा अनुकूल परिणाम आपल्या शरीरावर होतो.
आहार, विहार आणि औषध उपाययोजना या त्रिसूत्रीच्या माध्यमातून प्रत्येक ऋतूनुसार आपल्या खाण्यापिण्यात, राहणीमान, वागण्यात बदल केल्यास आरोग्याचे उत्तमरीत्या रक्षण करता येते. त्यामुळे उन्हाळ्यात काही पत्थ्य पाळावीत असा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांकडून देण्यात आला आहे.
उन्हाळा (ग्रीष्म ऋतू) हा साधारणपणे मराठी महिन्यानुसार वैषाख, ज्येष्ठ, आषाढ या कालावधीत असतो. उन्हाळ्याआधी असलेल्या वसंत ऋतूत वाढलेला कफदोष हा उन्हाळाच्या उष्णतेमुळे आपोआप कमी होतो. परंतु हवेतील उष्णता वाढल्याने वातावरण रुक्ष होते व शरीरात वातदोष वाढायला सुरुवात होते.
उन्हामध्ये कामामुळे, प्रवासामुळे शरीरातील उष्णता वाढून पर्यायाने भूक मंदावते, तहान फार लागते, थकवा येणे, चक्कर येणे, डोके दुखणे, ताप येणे, हात-पाय-पोट-डोळ्यामध्ये जळजळ होणे, घाम फार येणे, लघवीला जळजळ होणे, त्वचा कोरडी पडणे, निरुत्साही वाटणे, रक्तदाब वाढणे तसेच काही जणांना बेशुद्ध पडणे, अशी लक्षणे जाणवतात.
या पदार्थाचे करा सेवन
• दुध, तसेच घरचे लोणी व तुपाचे प्रमाण रोजच्या जेवणात असावे. मुख्य जेवणात ज्वारी, गहू, बाजरीची भाकरी, पोळी किंवा फुलका व तांदळाचा भात घ्यावा. डाळी व कडधान्यांपैकी मूग, तूर दररोज तर मसूर, मटकी अधूनमधून घ्यावी.
• भाज्यांमध्ये दुधी, पडवळ, भेंडी, दोडकी, पालक, कोहळा, काकडी, सूरण या नित्य वापराव्यात. स्वयंपाक करताना जिरे, धने, तमालपत्र, हळद, कोकम, वेलची अशा मसाल्यांचा वापर करावा.,
काढ्याने बरे होणारे आजार
मोरावळा, गुलकंद नित्य सेवन करावे उष्णतेचा त्रास अधिक वाटल्यास परिपाठादी काढा सकाळ - संध्याकाळ घ्यावा. लघवीला जळजळ होत असल्यास चंदनासव घ्यावे. आम्लपित्तासाठी भूनिंबादी काढा घ्यावा. डोळ्यांची जळजळ होत असल्यास पायाला गाईचे तूप चोळावे. डोके दुखत असल्यास पथ्यादी काढा घेता येतो.
रुक्ष धान्य वापरू नये
दही, लस्सी टाळावी. तसेच मका, नाचणी, जव अशी रुक्ष धान्ये वापरू नये. मटर, हरभरा, छोले, लसूण, हिंग, मोहरी, लाल मिरची, तीळ वापरू नये.
'ही' फळे लाभदायी
• या ऋतूमध्ये मिळणारी फळे जसे द्राक्षे, टरबूज, खरबूज, पिकलेला आंबा यांचा वापर करावा. आंबा खाण्याआधी तासभर तरी पाण्यामध्ये भिजवून ठेवावा, नंतर त्याचा रस काढून त्यात दोन चमचा साजूक तूप व चिमुटभर सुंठीचे चूर्ण टाकून खावा.
• अशाप्रकारे आंबा खाल्ल्याने उन्हाळ्यातील कोरडेपणा व निरुत्साह घालवून स्फूर्ती व शक्ती वाढवतो. याखेरीज केळी, शिंगाडा, गोड संत्री, मोसंबी, सफरचंद, नारळ ही फळे खावीत. मनुका, खारीक, रात्रभर पाण्यात भिजवलेले बदाम खावेत.
चहा कॉफी पिने टाळा
शहाळ्याचे पाणी या ऋतूत अत्यंत लाभदायक आहे. चहा- कॉफीचे प्रमाण कमी करून त्याऐवजी कोकम, लिंबू यांचे साखर, जिन्याची पूड टाकून तयार केलेले चविष्ट सरबत, उसाचा रस, कैरीचे पन्हे योग्य प्रकारे बनवून घेतले असता शरीर व मन प्रसन्न करते.
स्त्रियांनी रोज शतावरी कल्प दुधात टाकून सकाळी घ्यावा. ताप आल्यास स्वर्ण सुतशेखर घ्यावा. मात्र या औषधी वैद्यांच्या सल्ल्याने घ्याव्यात. - डॉ मिलिंद सज्जनवार, आयुर्वेद तज्ञ वर्धा.
हेही वाचा : रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यापासून ते वजन कमी करण्यापर्यंत आरोग्यासाठी गुणकारी 'गवती चहा'