खरीप हंगाम २०२३ मध्ये पावसाचा खंड, अतिवृष्टी, रब्बी हंगामात अवकाळी पाऊस यामुळे दोन्ही हंगामातील पिकांचे नुकसान होऊन अल्प उत्पादन हाती आले. परिणामी लागवड खर्च देखील निघाला नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात आहेत. आता उन्हाळी हंगामातील पिकांवर शेतकऱ्यांची भिस्त आहे. किनगाव जग सह परिसरात उन्हाळी मुगाचे पीक बहरले असून दाल वर्गीय पीक असल्याने शेतकऱ्यांना चांगल्या उत्पादनाची अपेक्षा आहे.
खरीप हंगामात पावसाचे आगमन उशीरा झाल्याने मूग पेरण्याची वेळ निघून गेल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना मुगाची पेरणी करता आली नाही. या हंगामात मूग आणि उडिदाचा पेरा नगण्य राहिला. सोयाबीन, कपाशी पेरणीला सुद्धा उशीर झाला.
त्यानंतर पावसाने खंड दिल्याने व विविध प्रकारचे पिकावर रोग पडल्याने उत्पादनात कमालीची घट झाली. त्यातच सोयाबीन, कपाशीला योग्य भाव मिळाला नसल्याने पेरणीला लागलेला खर्च वसूल झाला नाही. त्यानंतर ज्यांच्याकडे जलसिंचनाची व्यवस्था असलेल्या शेतकऱ्यांनी रब्बीत, हरभरा रब्बीची पेरणी केली.
या हंगामात झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकाची नासाडी झाल्याने बऱ्याच शेतकऱ्यांनी पिकावर वखर फिरवला. दुसरीकडे अवकाळी पाऊस झाल्यामुळे पाणीपातळीत वाढ झाली. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली. रब्बी हंगामातही पिकाचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे बजेट कोलमडले. पीक अत्यल्प आल्याने उन्हाळी मूग पेरल्यास दोन पैसे जास्त पदरात पडतील व त्याला भाव सुद्धा योग्य मिळेल या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी मुगाची पेरणी केली. सध्या मुगाच्या झाडाला फुले, शेंगा लागल्या असून पीक बहरले आहे. यातून चांगले उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.