श्यामकुमार पुरे
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात गेल्या १५ दिवसांत जवळपास ४ हजार हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी मिरचीची लागवड करण्यात आली असून, यावर्षी हा पेरा १० हजार हेक्टरवर जाण्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. तर मशागत व मल्चिंग अंथरण्यासाठी मजूर मिळत नसल्याने शेतकरी आधुनिक पद्धतीचा वापर करतांना दिसत आहेत.
सिल्लोड तालुक्यात शिवना, आमठाणा, गोळेगाव, पिंपळगाव येथे मिरचीची मोठी बाजारपेठ आहे. वाशी, गुजरात, सुरत व इतर ठिकाणाहून अनेक व्यापारी येथे मिरची खरेदीसाठी येतात. चांगला भाव मिळतो, म्हणून तालुक्यातील शेतकरी आता कापूस, मका सोडून मिरची लागवडीकडे वळल्याचे दिसत आहेत. रब्बी पिके हातात आल्याने आता शेती मशागतीची कामे सुरू झाली आहेत.
नांगरणी करणे, कल्टिव्हेटर करणे, काडी कचरा वेचणे, अशी मशागतीची कामे सध्या सुरू आहेत. यासाठी आता बैलजोडी नव्हे, तर ट्रॅक्टरचा उपयोग केला जात आहे. मल्चिंग लावल्याने कापूस असो की मिरची या पिकांवर रोग कमी येतो. म्हणून शेतकरी आता कापूस व मिरची मल्चिंगवरच लावत आहेत.
मल्चिंग अंथरण्यासाठी मजुरांची चणचण भासत असल्याने शेतकरी आधुनिक पद्धतीने मशीनचा वापर करून मल्चिंग लावत आहेत. यातून पैशांची बचत होत आहे. या मशीनने चांगल्या पद्धतीने मल्चिंग जमिनीत बसते.
मल्चिंगसाठी बंडल कमी लागते. हवेत मल्चिंग उडण्याची शक्यता कमी होते. एकरी मल्चिंग लावण्यासाठी ८ ते १० मजूर लागत होते. आता अजिंठा येथील अजय तोमर, ईश्वर राजपूत या शेतकऱ्यांनी राजकोटून येथून मल्चिंग अंथरण्यासाठी एक मशीन आणली आहे.
ट्रॅक्टरच्या माध्यमातून एका तासात एक एकर मल्चिंग पसरवली जाते. आधी याला एक दिवस लागत होता. आता या मशीनसाठी शेतकरी त्यांच्याकडे मागणी करत आहेत. या मशीनद्वारे एकरी दोन हजार रुपये भाडे आकारून मल्चिंग पसरवून दिली जात आहे.
मिरची पिकाला सकाळी पाणी द्यावे
ऊन जास्त असल्याने दिवसभर जमीन तापते. रात्रभर जमीन थंड होते. यामुळे ज्यांनी मिरची लागवड केली असेल त्यांनी सकाळी ९ वाजेच्या आत मिरचीला पाणी द्यावे. - गणेश फुसे, कृषी पर्यवेक्षक
अधिक वाचा नोकरीचा मार्ग सोडत दुष्काळग्रस्त भागात तरुणाने उभारली संत्र्याची बाग