संतोष वानखडे
यंदाच्या उन्हाळ्यात तीन टँकर व ९२ विहिरी अधिग्रहणाद्वारे नागरिकांची तहान भागविणाऱ्यांना आर्थिक मोबदल्यासाठी आणखी तीन ते चार महिने प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
दोन पंचायत समित्यांचा अपवाद वगळता उर्वरित चार पंचायत समित्यांकडून अद्याप निधी मागणीचे प्रस्ताव जिल्हास्तरावर प्राप्त झाले नाहीत.जिल्ह्यात एप्रिल ते जून २०२४ या तिमाहीत १३४ गावांत विहीर अधिग्रहण, तर १० गावांत टँकरने पाणीपुरवठा प्रस्तावित करण्यात आला होता. प्रत्यक्षात तीन गावांत टँकरने पाणीपुरवठा, तर ९२ गावांत विहीर अधिग्रहण करण्यात आले. टँकरने पाणीपुरवठा व विहीर अधिग्रहण केल्यानंतर शासनाकडून पाणी टँकर मालक व विहीर मालकांना आर्थिक मोबदला दिला जातो.
यासाठी पंचायत समिती स्तरावरून निधी मागणीचे प्रस्ताव जिल्हास्तरावर आणि जिल्हास्तरावरून विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत राज्य शासनाकडे पाठविणे अनिवार्य आहे. साधारणतः १५ ते २० दिवसात तालुकास्तरावरुन जिल्हास्तरावर प्रस्ताव प्राप्त होणे अपेक्षित असते.
दीड महिना उलटला तरी अद्याप दोन पंचायत समित्यांचा अपवादवगळता उर्वरित चार पंचायत समित्यांकडून जिल्हास्तरावर निधी मागणीचे प्रस्ताव प्राप्त झाले नाहीत.
पंचायत समिती स्तरावरून दिरंगाई होत असल्याने पुढील प्रशासकीय कार्यवाही प्रभावित होत आहे.
त्यामुळे शासनाकडे निधी मागणी प्रस्ताव पाठविणे आणि त्यानंतर शासनाकडून निधी मिळणे, या प्रक्रियेला आणखी विलंब लागण्याचे संकेत मिळत आहेत.
उन्हाळ्याच्या टंचाईत पाणी पुरविले. नागरिकांची तहान भागविली, मग आर्थिक मोबदल्यासाठी हिवाळा किंवा पुढील उन्हाळ्यापर्यंत वाट पाहायची का? अशा संतप्त प्रतिक्रिया विहीर मालकांमधून उमटत आहेत.
तीन टँकरसाठी हवे १८ लाख
• यंदाच्या उन्हाळ्यात वनोजा (ता. मंगरूळपीर), उमराळा व श्रीगिरी (ता. वाशिम) अशा तीन गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला होता.
• उमराळा व श्रीगिरी येथील टँकरसाठी प्रत्येकी चार लाख रुपये तर वनोजा येथील टँकरसाठी १० लाख रुपयांचा खर्च झाला.
• तीन टँकरवरील खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी शासनाकडून १८ लाखांचा निधी हवा आहे.
• पंचायत समिती स्तरावरून निधी मागणीचे प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर एकत्रित अहवाल विभागीय आयुक्तांमार्फत शासनाकडे पाठविला जाणार आहे.
कोणत्या तालुक्यात किती विहीर अधिग्रहण?
तालुका गावे
• वाशिम १२
• मालेगाव १४
• रिसोड ११
• कारंजा १४
• मानोरा १९
• मं.पीर २२
कोणत्या तालुक्यात किती खर्च?
वाशिम ४,४३,४७८
मालेगाव ५,१७,३९१
रिसोड ४,०६,५२१
कारंजा ५,१७,३९१
मानोरा ७,०२,१७३
मं.पीर ८,१३,०४६
२०२४ च्या उन्हाळ्यात पाणीटंचाई कृती आराखड्यातून राबविलेल्या उपाययोजनांसंदर्भातील निधी मागणीचे प्रस्ताव काही ब्लॉकमधून प्राप्त झाले आहेत तर काही ब्लॉकमधून लवकरच प्रस्ताव प्राप्त होतील.
- अजिंक्स वानखडे, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद वाशिम