Join us

उन्हाळी पिकांना कालव्याच्या पाणीपाळीचा आधार! प्रखर उन्हातही पिके जोमात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2024 9:37 AM

मोठा पाऊस पडेपर्यंत पाणीपाळीत सातत्य ठेवण्याची मागणी

गत जून महिन्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिले असले तरी सिद्धेश्वर धरणातून मिळणारे पाणी पाटबंधारे विभागाच्या कालव्यामार्फत वेळेवर मिळत आहे. त्यामुळे उन्हाळी पिकांना प्रखर उन्हातही आधार मिळत आहे. मोठा पाऊस पडेपर्यंत पाणीपाळीत सातत्य ठेवावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

यावर्षी पावसाचे प्रमाण कमीच राहिले. त्यामुळे विहिरी, तलाव व इतर जलस्रोत आटून गेले आहेत. खरे पाहिले दरवर्षी सिद्धेश्वर धरणातून कालव्यामार्फत दिले जाणारे पाणी यावर्षी एक महिना उशिराने सोडण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांना उन्हाळी पिके घेण्यासाठी पाणी सोडा, अशी मागणी निवेदनाद्वारे करावी लागली. शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन कालवा प्रशासनाने पाणीपाळीत सातत्य ठेवले.

या पाण्यावरच जवळाबाजार, असोला, कोंडशी, नालेगाव, तपोवन, करंजाळा, बोरी, कळंबा, आडगाव (रंजे) आदी भागांतील शेतकऱ्यांनी ऊस, केळी, संत्रा या बागायती पिकांबरोबर उन्हाळी तीळ, उन्हाळी भुईमूग, उन्हाळी सोयाबीन आदी पिके घेतली. यामध्ये आठ दिवसांपासून काही गावांत भुईमूग पिकाची काढणीही सुरू झाली असून शेंगाही बाजारात येत आहेत.

मोठा पाऊस पडेपर्यंत पाणीपाळी द्यावी

■ पाटबंधारेच्या कालव्यामार्फत पाणीपाळी देणे नियमितपणे सुरू आहे; परंतु उन्हाची तीव्रता लक्षात घेता पाणीपाळी बंद केली जाणार असे सांगितले जात आहे. तेव्हा कालवा प्रशासनाने मोठा पाऊस पडेपर्यंत पाणीपाळी सुरूच ठेवावी.

■ जेणे करून उन्हाळी पिके व भाजीपाला पिके जगू शकतील, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

उन्हाळी पिकांनाही भाव मिळेना

गत खरीप व रबी हंगामातील कोणत्याही पिकांना म्हणावा तसा भाव मिळाला नाही. उन्हाळी पिकांना तरी भाव मिळेल असे शेतकऱ्यांना वाटत आहे; परंतु भाव मात्र काही योग्य मिळत नाही.- माधव चव्हाण, आडगाव (रंजे), शेतकरी

कालव्याच्या पाण्यात सातत्य असल्यामुळे जवळाबाजार व परिसरातील सात ते आठ गावांनी उसाची लागवड केली आहे. पाणी वेळेवर मिळत असल्यामुळे ऊस पीक सध्या जोमात आहे.-विनायक साळुंके, आजरसोंडा, शेतकरी

टॅग्स :शेतीपीक व्यवस्थापनपाणीहिंगोली