कोल्हापूर : महावितरणने दिलेल्या प्रस्तावानुसार प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेतील ग्राहकांना गरजेवेळी संध्याकाळी सहा ते सकाळी नऊ या वेळेत वीज बिलाची आकारणी केली, तर या योजनेकडे नवीन ग्राहक पूर्णपणे पाठ फिरवणार आहेत.
परिणामी योजनाच गुंडाळण्याचा धोका आहे. यामुळे कोणत्याही परिस्थितीत या योजनेतील ग्राहकांना वीज बिलाची आकारणी करू नये, अशी मागणी द महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने केली आहे.
या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांनी पाठवले आहे. असोसिएशनच्या येथील जिल्हा पदाधिकाऱ्यांचीही बैठक घेऊन आयोगाच्या सुनावणीत ग्राहकांची ठोस बाजू मांडण्याचा निर्धार केला आहे.
विजेचे उत्पादन आणि मागणीत अजूनही तफावत आहे. यामुळेच प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेतील ग्राहकांना ३०० युनिटपर्यंत मोफत वीज आणि अतिरिक्त वीज विकत घेण्याचे धोरण अवलंबले.
या योजनेतून अधिकाधिक ग्राहक घराच्या छतावर सौर ऊर्जानिर्मिती पॅनेल बसवावेत, यासाठी महावितरण कंपनीने प्रोत्साहन दिले. कंपन्यांच्या डीलर्सना टार्गेट देऊन पॅनेल बसवण्यास ग्राहकांना भाग पाडले.
पॅनेलसाठी अडीच लाख रुपये नसतील त्यांना राष्ट्रीयीकृत बँकांकडून कर्ज उपलब्ध करून दिले. यामुळे राज्यात आता एक लाखाहून अधिक ग्राहकांनी पॅनेल बसवून योजनेचा लाभ घेतला.
यांना आता घरगुती वीज बिल शून्य येत आहे. पण, महावितरणच्या नव्या प्रस्तावानुसार यांना रात्रीची वीज विकत घ्यावी लागली, तर हे ग्राहक बिलाचे पैसे आणि पॅनेल बसवण्यासाठी घेतलेल्या कर्जावरील व्याजाचे हप्ते भरून मेटाकुटीस येणार आहेत.
आता पहिल्या टप्प्यात सोलर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन आपला व्यवसाय बुडतो, रोजगार जातो, म्हणून शासनाकडे धाव घेत आहे. ग्राहकांनी अजून संघटीतपणे आवाज उठवलेला नाही. त्यांच्या खिशाला आर्थिक झळ बसल्यानंतर ते महावितरणकडे धाव घेणार आहेत.
वीज बिल शून्य येणार, म्हणून अडीच लाख रुपये बँकेचे कर्ज काढून सौर ऊर्जानिर्मिती पॅनेल घरावर बसवले आहे. असे असताना मला वीज बिलाची आकारणी केली, तर बँकेचा हप्ता, वीज बिल भरणे अशक्य होणार आहे. - अशोक राऊत, ग्राहक, शिवाजी पेठ, कोल्हापूर
मोफत वीज मिळणार, म्हणून सूर्यघर योजनेतून पॅनेल बसवण्यासाठी नव्याने सुमारे पाच लाख ग्राहक इच्छुक आहेत. बिल आकारणी झाली, तर हे ग्राहक पॅनेल बसवणार नाही. सोलर मॅन्युफॅक्चरर्स उद्योगास मंदी येईल. यावरील राज्यातील अडीच लाख जणांचा रोजगार जाईल. आता पॅनेल बसवलेल्यांनाही पश्चाताप होईल. - शशिकांत वाकडे, अध्यक्ष, द महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन
अधिक वाचा: 'सूर्यघर'च्या ग्राहकांनाही वीज बिलाचा शॉक, रात्रीची वीज विकतच मिळणार; काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर