पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिना तीनशे युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना मोफत वीज मिळावी आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्नही मिळावे यासाठी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना सुरु केली आहे.
या योजनेच्या अंमलबजावणीत महावितरणने राज्यात बुधवारी एक लाख घरांचा टप्पा ओलांडला. यात नगर जिल्ह्यात २५७० घरांवर सौर पॅनेल बसवण्यात आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वसामान्य ग्राहकांना थेट लाभ मिळवून देणाऱ्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या अंमलबजावणीवर भर दिला आहे. या योजनेत घराच्या छतावर सौर ऊर्जानिर्मिती पॅनेल्स बसवून वीज निर्माण केली जाते.
घरगुती वापरापेक्षा जास्त वीज तयार झाल्यामुळे वीजबिल शून्य होते, तसेच अतिरिक्त वीज महावितरणच्या जाळ्यात पाठवून उत्पन्नही मिळते. छतावर सौर ऊर्जा पॅनेल्स बसविण्यासाठी केंद्र सरकारकडून तीन किलोवॉटला ७८ हजार रुपयांपर्यंत थेट अनुदान मिळते.
घरगुती ग्राहकांच्या मदतीसाठी पंतप्रधान मोदी यांनी गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात ही योजना सुरू केली होती. राज्यात दि. २१ जानेवारीअखेर या योजनेत एकूण १ लाख ७०० घरांवर सौरऊर्जा प्रकल्प बसविले गेले.
त्यामध्ये ३९२ मेगावॅटची क्षमता निर्माण झाली व ग्राहकांना ७८३ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाले. दि. २१ जानेवारी रोजी एका दिवसात ११९५ घरांवर सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प बसविले. राज्यात नागपूर जिल्ह्याने सर्वाधिक १६९४९ घरांवर सौरऊर्जानिर्मिती प्रकल्प बसवून प्रथम क्रमांक मिळविला आहे.
पुणे (७९३१ घरे), जळगाव (७५१४ घरे), छत्रपती संभाजीनगर (७००८ घरे), नाशिक (६६२६ घरे), अमरावती (५७९५ घरे) आणि कोल्हापूर (५०२४ घरे), अहिल्यानगर (२५७० घरे) हे जिल्हे योजनेचा लाभ घेण्यात आघाडीवर आहेत.
घरगुती वीज ग्राहकांना छतावर सौरऊर्जानिर्मिती प्रकल्प बसविता यावा, यासाठी बँकांकडून माफत व्याजदरात कर्ज उपलब्ध केले जात आहे, तसेच कर्जाची प्रक्रियाही सुलभ करण्यात आली आहे.
या योजनेचा लाभ घेण्यास ग्रामीण ग्राहकांना प्रोत्साहन देणाऱ्या ग्रामपंचायतींना प्रोत्साहन निधीही देण्यात येणार आहे.
१ दिवसात ११९५ घरांवर राज्यात सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प बसविले. या योजनेचा लाभ घेण्यास ग्रामीण ग्राहकांना प्रोत्साहन देणाऱ्या ग्रामपंचायतींना प्रोत्साहन निधीही देण्यात येणार आहे. कर्जाची प्रक्रियाही सुलभ करण्यात आली आहे.
मोफत नेट मीटर
१) प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्याची जबाबदारी महावितरणकडे आहे. या योजनेतील ग्राहकांना मोफत नेट मीटर देण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे.
२) योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना https://pmsuryaghar.gov.in या वेबसाइटवर नोंदणी करावी लागते.
३) त्यांना केंद्र सरकारकडून एक किलोवॅट क्षमतेच्या छतावरील सौरऊर्जा निर्मिती प्रकल्पासाठी तीस हजार रुपये, दोन किलोवॅट क्षमतेसाठी साठ हजार रुपये, तर तीन किलोवॅट किंवा त्यापेक्षा अधिक क्षमतेसाठी ७८ हजार रुपये थेट अनुदान मिळते.
अधिक वाचा: Solapur Kadak Bhakri : गरिबांच्या ताटातील भाकरी आता श्रीमंताच्या ताटात; कडक भाकरी उद्योग लय भारी