कोल्हापूर : राज्य शासनाने १ नोव्हेंबरपासून साखर कारखान्यांना ऊस गळीत हंगाम सुरू करण्याचे आदेश दिले असले तरी कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांची धुराडी अद्याप थंडच आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका कारखानदारांनी घेतला असून बॉयलर पेटवून, ऊसाची मोळी टाकून मुहूर्त केला पण अद्याप एकाही कारखान्याने उसाच्या तोडी दिलेल्या नाहीत. संघटनेच्या आंदोलनाचा अंदाज घेऊनच ऊसतोडी देणार हे निश्चित आहे.
मागील हंगामात साधारणत: ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा हंगाम सुरू झाला होता. गेल्या वर्षी ऊस परिषद घेत ‘स्वाभिमानी’ने ऊस दराचे आंदोलन सुरू केले होते. मात्र, यंदा मागील हंगामातील चारशे रुपये द्या, यासाठी गेली महिनाभर कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात संघटनेने रान पेटवले आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांनी ‘आक्रोश पदयात्रा’ काढत कारखानदारांना इशारा दिला आहे. कारखानदारांनी दसऱ्यापासून बॉयलर पेटवून, उसाच्या मोळ्या टाकून मुहूर्त केला आहे. राज्य सरकारनेही १ नोव्हेंबरपासून गळीत हंगाम सुरू करण्यास परवानगी दिली आहे. पण, बुधवारी जिल्ह्यातील एकाही कारखान्याचे धुराडे पेटलेले नाही. काही कारखान्यांनी ऊसतोडी देऊन अंदाज घेण्याचा प्रयत्न केला, पण संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तोडी हाणून पाडल्याने कारखान्यांची तोडणी यंत्रणा धाडस करेना.
ऊस परिषदेनंतरच कोंडी फुटणार?
‘स्वाभिमानी’ शेतकरी संघटनेची मंगळवारी (दि. ७) जयसिंगपूर येथे ऊस परिषद होत आहे. यामध्ये यंदाच्या हंगामातील ऊस दराची घोषणा होणार आहे. त्यानंतरच हंगामाची कोंडी फुटण्याची दाट शक्यता आहे.
एकरकमी एफआरपी देण्याची तयारी
जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्यांची पहिली उचल एकरकमी एफआरपी देण्याची तयारी आहे. चार कारखान्यांनी तशी घोषणाही केली आहे. पण, संघटनेची मागणी आणि कारखानदारांची तयारीमुळे त्रांगडे तयार होणार आहे.
पालकमंत्र्यांनी मध्यस्थीची भूमिका बजवावी
साखर कारखानदार व संघटना यांच्यामध्ये हा पहिल्यांदा संघर्ष नाही. यापूर्वी जोरदार संघर्ष झाला, स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांच्यासारख्या ज्येष्ठ मंडळींनी मध्यस्थी करत तोडगा काढला होता. आता, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना मध्यस्थीची भूमिका घ्यावी लागणार आहे.
कर्नाटकातील कारखाने सुरू
कर्नाटकातील बहुतांशी कारखाने सुरू झाल्याने सीमा भागातील कारखान्यांची घालमेल सुरू झाली आहे. कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात ऊस आणला जातो, मात्र, आंदोलनामुळे सगळेच ठप्प झाले आहे.
संचारबंदीमुळे मजूर अडकले
मराठा आरक्षणाचे आंदोलन पेटले असून मराठवाड्यात त्याचा वणवा झाला आहे. कोल्हापुरातील कारखान्यांकडे बीड, लातूर आदी भागातील मजूर ऊस तोडणीसाठी येतात. संचारबंदीमुळे मजूर अडकले आहेत.