जयसिंगपूर: आगामी गळीत हंगामात तुटणाऱ्या उसाला प्रतिटन एकरकमी एफआरपीसह ३७०० पहिली उचल जाहीर करा, मगच उसाला कोयता लावा. शिवाय गतवर्षी तुटलेल्या उसाला दिवाळीपूर्वी २०० रुपये दुसरा हप्ता सर्व कारखानदारांनी द्यावाच लागेल.
फक्त शेतकऱ्यांनी मला साथ द्या, रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढण्याची माझी तयारी आहे. १७ नोव्हेंबरला कारखाने सुरु होणार आहेत. २१ दिवसांची अजून मुदत शिल्लक आहे.
त्यामुळे योग्य तो निर्णय कारखानदारांनी घ्यावा; अन्यथा गाठ स्वाभिमानीशी आहे, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी ऊस परिषदेत दिला. जयसिंगपूर येथील विक्रमसिंह मैदानावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या २३ व्या ऊस परिषदेत ते बोलत होते.
परिषदेला प्रतिवर्षाप्रमाणे हजारो शेतकऱ्यांनी उत्स्फूर्दपणे हजेरी लावत राजू शेट्टी यांच्या एल्गाराला पाठिंबा दिला. अध्यक्षस्थानी शिवाजीराव रोडे होते. प्रारंभी स्वागत शैलेश आडके तर प्रास्ताविक विठ्ठल मोरे यांनी केले.
शेतकऱ्यांच्या घामाचे दाम मिळावे, यासाठी आंदोलन केल्यामुळे ज्या-त्या वेळच्या सरकारने आमच्यावर दरोडे, खुनाचे गुन्हे दाखल करून चळवळ मोडीत काढण्याचा प्रयत्न केला. पण चळवळ मोडणारे अजून जन्माला यायचे आहेत.
आमचे कार्यकर्ते त्यांना पुरून उरले आहेत, असे सांगून शेट्टी म्हणाले, स्वाभिमानीच्या लक्ष्धामुळेच गतवर्षीचे शंभर रुपये मिळाले आहेत. केंद्र सरकार शुगर ऑर्डर १९६६ नुसार दुरुस्तीचा प्रस्ताव सादर करीत आहे.
यामुळे कारखानदार गब्बर होणार असून या विधेयकावर शरद पवार का बोलत नाहीत. एकट्या पवार कुटुंबियांचे दररोज दीड लाख गाळप करण्याची क्षमता असलेले कारखाने आहेत. महाविकास व महायुती हे दोन्हीही शेतकऱ्यांना लुटण्यासाठी आहेत.
ऊस वाहतूकदारांचे ४० कोटी रुपये स्वाभिमानीच्या लढ्यामुळे वसूल झाले आहेत. ऊसदराच्या माध्यमातून राज्याचा आर्थिक कणा मजबूत केला आहे. सावकर मादनाईक म्हणाले, गेल्या वर्षी जे शंभर रुपये मागितले ते पदरात पाडून दिले. आता गेल्या वर्षीचे दोनशे रुपये घ्यायचे आहेत.
पंढरपूरच्या कारखान्याने ३५०० रुपये एकरकमी एफआरपी जाहीर केली आहे. येथील कारखान्यांनी चार हजार रुपये दर जाहीर करावा आणि त्या नेत्याची निवडणूक आम्ही बिनविरोध करतो, राजू शेट्टी जो आदेश देतील तो सर्वांनी मान्य करून एकदिलाने लढायचे आहे.
गतवर्षी शंभर रुपये आम्हाला नको म्हणणारेच शंभर रुपये घेण्यासाठी रांगेत ते पुढे होते, अशीही टीका त्यांनी केले. यावेळी हुक्कीरेचे माजी पालकमंत्री शशिकांत नाईक, पोपट मोरे, वैभव कांबळे, जनार्दन पाटील, अजित पवार, सूर्यभान जाधव, महेश खराडे, रसिका ढगे, राजेंद्र गड्याण्णावर, प्रकाश पोफळे, संतोष काकडे, विजयकुमार कोले, सचिन शिंदे, आण्णासो चौगुले, सुवर्णा अपराज, आसावरी आडके, राम शिंदे आदी उपस्थित होते
ऊस परिषदेत असे झाले ठराव
• आगामी गळीत हंगामासाठी एकरकमी एफआरपीसह ३७०० रुपये द्या.
• नाबार्डने साखर कारखान्यांना साखर तारण कर्ज ३ टक्के व्याजदराने द्यावे.
• शेतीपंपांना दिलेली वीज सवलतीमध्ये एचपीची अट काढावी.
• खांडसरी, गूळ प्रकल्पांना सिरपपासून इथेनॉल करण्यास परवानगी द्यावी.
• वाहतूक खर्चासाठी अंतरानुसार टप्पे तयार करून त्यानुसार वसुली करावी.
• फसवणूक करणाऱ्या ऊस तोडणी मुकादमांवर गुन्हे दाखल करा.
• वजनकाटे ऑनलाइन करा.
• गेल्या वर्षी तुटलेल्या उसाला दिवाळीपूर्वी दोनशे रुपये द्यावे.
• अतिवृष्टी व परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ मदत द्या.