बुलढाणा : वाढती लोकसंख्या, विकासाच्या विविध योजना आणि जमीन हस्तांतरणाचा वाढलेला वेग पाहता गावठाणाचे अभिलेखे अद्ययावत करण्याच्या दृष्टीने केंद्राच्या स्वामित्व योजनेतंर्गत ग्रामविकास, महसूल आणि भूमी अभिलेख विभागाने राबविलेल्या उपक्रमातंर्गत बुलढाणा जिल्ह्यात ड्रोनद्वारे सर्व्हेक्षण करण्यात आलेल्या १,०५६ गावापैकी ८७८ गावांचे डिजिटल मिळकत पत्र (प्रॉपर्टी कार्ड) तयार झाले आहे.
आता एका क्लिकवर मालमत्तेची सनद व प्रॉपर्टीकार्ड ग्रामस्थांना उपलब्ध होणार आहे.
जिल्ह्यातील १४६२ महसूली गावांपैकी १०५६ गावांचे ड्रोनद्वारे सर्व्हे ऑफ इंडिया आणि जमाबंदी आयुक्त कार्यालयाच्या वतीने गावठाणातील मिळकतीचे सर्व्हेक्षण करून प्रतिमांचे भू-संदर्भीकरणाद्वारे (जीईओ रेफरन्सींग) गावठाणाचे डिजिटल नकाशे तयार करण्याची मोहीम आहेत.
जिल्ह्यात २२ फेब्रुवारी २०१९ च्या निर्णयानुसार सुरू करण्यात आली होती. २१ जानेवारी २०२० पासून प्रत्यक्ष त्या कामास मार्गदर्शक सूचना मिळाल्यानंतर प्रारंभ झाला. त्यातंर्गत या १०५६ गावांचे ड्रोनद्वारे सर्व्हेक्षण करण्यात येऊन १०४६ गावांतील कामही पूर्ण झाले आहे.
त्यामुळे गावठाणांचा झालेला विस्तार, नव्याने तयार झालेल्या मालमत्तांचे सर्वेक्षण करून गाव पातळीवर तथा वैयक्तिक पातळीवर मिळकत पत्र (प्रॉपर्टी कार्ड) उपलब्ध करण्याच्या दृष्टीने बुलढाणा जिल्ह्याने आता महत्त्वपूर्ण पाऊल पुढे टाकले आहे.
यातंर्गत सर्व्हे ऑफ इंडियाकडून सर्व मिळकतींचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण होऊन जीएसआय डेटा (नकाशातील मिळकती) ग्रामपंचायतीच्या मिळकत रजिस्टरशी जोडण्यात येऊन त्यावर आधारीत हे डिजीटल मिळकत पत्र तयार करण्यात आले आहेत.
हा होईल फायदा!
* विस्तारलेल्या गावठाणाची अचूक माहिती उपलब्ध झाल्याने गावाची मालमत्ता, प्रत्येक व्यक्तीच्या मालमत्तेचा डिजीटल नकाशा उपलब्ध होत आहे.
* मालमत्तासंदर्भातील हक्क व दावे आता वाद न होता सहजतेने निकाली काढण्यास मदत होईल. सोबतच ग्रामपंचायतींना अचूक माहिती मिळाल्यामुळे कर वसुली वाढण्यास मदत होऊन शासनाच्या महसूलात भर पडले.
* शासनाच्या व नागरिकांच्या मालमत्तांचे प्रॉपर्टी कार्डही व सनद मिळाल्यामुळे कायदेशीर पुरावा हक्कही तयार झाला आहे.
गावठाणांची माहिती डिजिटल स्वरूपात
स्वामित्व योजनेमुळे नागरिकांना त्यांच्या मालमत्ता हक्काचा कायदेशीर पुरावा मिळतानाच नागरिकांच्या हक्काचे संवर्धन झाले आहे. गावठाणांची डिजिटल स्वरूपात माहिती उपलब्ध झाली आहे.
शासनाच्या मिळकतींचेही संरक्षण
यामुळे शासनाच्या मिळकतींचेही संरक्षण करणे अत्यंत सोपे झाले आहे. गावातीलघरे, रस्ते, खुल्या जागा, नाले यांच्या सीमा याद्वारे निश्चित झाल्या असून, शासकीय जागेवरील अतिक्रमण हटविण्यास हे तंत्रज्ञान साहाय्यभूत ठरणार आहे.
मिळकतीचे अचूक व डिजीटल नकाशे उपलब्ध झाल्यामुळे गावठाण भूमापनाचे नकाशे उपलब्ध झाल्याने विकासाचे नियोजन व कामे करताना शासन तथा विकासकांना मोठी मदत मिळणार आहे.
जिल्ह्यातील १०४६ गावांतील काम पूर्ण
* सर्व्हे ऑफ इंडियाकडून जिल्ह्यातील १०३२ गावांचे डिजिटल नकाशे मिळाले.
* ९८३ गावांची चौकशी नोंदवही आणि अंतिम नकाशा तयार झाला आहे.
* ९२१ गावांची सनदही सर्व्हे ऑफ इंडियाकडून जिल्ह्याला प्राप्त झाली आहे. ८७८ गावांतील मिळकत पत्रिका वर्तमान स्थितीत ऑनलाइन उपलब्ध झाल्या आहेत.
* जिल्ह्यात जवळपास ६ लाखांच्या आसपास मालमत्ता आहेत. त्यांपैकी १ लाख ९८ हजार २१३ मालमत्तांची मिळकतपत्रेही आतापर्यंत अचूकपणे तयार झालेली आहेत.
* ५० गावांतील १४१२८ जणांच्या सनद वाटपाची तयारी पूर्ण
हे ही वाचा सविस्तर : Swamitva Yojana : शासनाच्या स्वामित्व योजनेतून हक्काच्या जागेची कायमस्वरूपी नोंद करणे आता शक्य? वाचा सविस्तर