श्याम पुंगळे
राजूर : जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील लोणगाव येथील शेतकऱ्यांनी यंदा मोठ्या प्रमाणात रताळ्याची लागवड केली आहे. त्यातून त्यांना लाखों रुपयांचे उत्पन्न झाले आहे.
या गावातील प्रत्येक शेतकऱ्यांनी यंदा रताळ्याची लागवड (Cultivation) केली आहे. या गावातील अल्पभूधारक किमान १० गुंठ्यांत तर काही १ ते ४ एकरपर्यंत रताळ्याची शेती यशस्वी करत आहेत.
सध्या महाशिवरात्री तोंडावर आली असून, लोणगाव येथील शेतकरी रताळी (Sweet Potato) काढणीवर भर देत आहेत. एका एकरात अडीच लाखांचे उत्पन्न होत असल्याचे अल्पभूधारक शेतकरी सोमीनाथ फुके यांनी सांगितले.
लोणगाव येथील शेतकऱ्यांचा रताळ्याची शेती करण्यावर अधिक भर आहे. आरोग्याच्या दृष्टीने पोषक असणाऱ्या रताळ्याची उपवासाच्या दिवशी म्हणजेच महाशिवरात्रीला मोठी मागणी असते.
या शेतकऱ्यांनी महाशिवरात्रीजवळ येताच जमिनीतून रताळ्यांची काढणी (Harvesting) सुरू केली आहे. ही रताळी महाशिवरात्रीला बाजारात विक्रीसाठी नेली जाते. त्यातून लाखोंची उलाढाल होते. सध्या दोन हजार रूपये क्विंटलचा भाव मिळत आहे. एका एकरात मिळते लाखोंचे उत्पन्न शेतकऱ्यांना मिळत आहे.
जुलै महिन्यात केली जाते रताळ्याची लागवड
* लोणगाव येथील शेतकरी साधारणतः जुलैमध्ये रताळ्याची लागवड करतात. महाशिवरात्रीनिमित्त उपवासाच्या दिवशी फराळ म्हणून बाजारात मोठी मागणी असते.
* महाशिवरात्रीपूर्वी रताळ्यांची काढणी केली जाते. हे पीक कमी खर्चात व कमी वेळेत हलक्या प्रतीच्या जमिनीत उत्तम प्रकारे येते. सध्या सर्वत्र रताळी काढणी सुरू आहे. यात टॅक्ट्रर, तर काहीजण बैलजोडीच्या साह्याने रताळी काढून पोत्यात भरतात.
* ७ लाख रुपयांचे उत्पन्न रताळे शेतीतून तीन एकरात मिळतेच. काहीवेळा कमी-जास्त प्रमाणात उत्पन्न मिळते. त्यामुळे अधिक कल वाढला आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही आम्ही रताळी लागवड केली होती. आता महाशिवरात्री जवळ आली असून, रताळी काढणीचे काम हाती घेतले आहे. आम्ही लावलेल्या दोन एकरांत दीडशे क्विंटल रताळ्याचे उत्पादन होण्याची शक्यता आहे. - सोमेश तवले, शेतकरी, लोणगाव.
व्यापारी थेट बांधावर येतात
महाशिवरात्री तोंडावर आली की, अनेक व्यापारी शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन रताळ्याची खरेदी करतात. काही शेतकरी स्वतः बाजारपेठेत जाऊन किरकोळ पद्धतीने विक्री करतात. बहुतांश शेतकरी व्यापाऱ्यांना ठोक भावाने विक्री करतात. ही रताळी खरेदीसाठी जालना, अहिल्यानगर, केज, धारूर, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील व्यापारी थेट बांधावर येत आहेत. - सोमीनाथ फुके, शेतकरी, उंबरखेडा.