Join us

पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करतांना 'अशी' घ्या काळजी; अबाधित आरोग्यासह टळेल आर्थिक हानी

By रविंद्र जाधव | Updated: January 13, 2025 13:40 IST

फवारणी करता वेळेस विषबाधा झाल्याने रुग्णालयामध्ये भरती व्हावे लागते. याच अनुषंगाने आज आपण जाणून घेणार आहोत कीटकनाशके वापरताना शेतकऱ्यांनी सर्वसाधारणपणे कोणती काळजी घ्यायची आहे.

पिकांवरील विविध किडींचे नियंत्रण करण्यासाठी शेतकरी बांधव त्यावर वारंवार कीटकनाशकांची फवारणी करत असतात. मात्र फवारणी करत असताना अनेक शेतकरी योग्य ती काळजी घेत नाही.

परिणामी अनेकदा फवारणी करता वेळेस विषबाधा झाल्याने रुग्णालयामध्ये भरती व्हावे लागते. याच अनुषंगाने आज आपण जाणून घेणार आहोत कीटकनाशके वापरताना शेतकऱ्यांनी सर्वसाधारणपणे कोणती काळजी घ्यायची आहे.

१) गळके फवारणी यंत्र न वापरता ते दुरुस्त करुन वापरावे.

२) किटकनाशक फवारणी यंत्रात भरतांना सांडू नये यासाठी नरसाळयाचा वापर करावा.

३) तणनाशक फवारणीसाठी वेगळा पंप वापरावा व तो पंप किटकनाशक फवारणीसाठी वापरु नये.

४) किटकनाशक वापरतांना संरक्षक कपडे वापरावेत.

५) फवारणीसाठी वापरलेले सर्व साहित्य पाण्याने स्वच्छ धुवून ठेवावेत.

६) झिजलेले, खराब झालेले नोझल्स बदलून घ्यावेत.

७) किटकनाशकाला हुंगणे किंवा त्याचा वास घेणे टाळावे.

८) फवारणीचे मिश्रण हाताने न ढवळता लांब लाकडी दांडयाचा किंवा काठीचा वापर करावा.

९) किटकनाशक पोटात जाण्याची शक्यता असल्यामुळे फवारणीचे मिश्रण करतांना अथवा फवारणीच्या वेळी तंबाखू खाणे अथवा धुम्रपान करणे टाळावे.

१०) फवारणीचे काम पुर्ण झाल्यानंतरच हात साबणाने स्वच्छ धूवून खाणे पिणे करावे.

११) फवारणीच्या वेळी लहान मुले, जनावरे, पाळीव प्राणी यांना त्या ठिकाणापासून दूर ठेवावे.

१२) उपाशी पोटी फवारणी न करता फवारणीपूर्वी न्याहारी करावी.

१३) फवारणी करतांना वापरलेली भांडी इ. साहित्य नदी ओढे किंवा विहीरीजवळ धूवू नयेत. तर धूतांना वापरलेले पाणी त्यात विषारी अवशेष असल्याने पडीक जमिनीत टाकावे अथवा मातीत गाडावे.

१४) किटकनाशकांच्या रिकाम्या बाटल्या वापरानंतर नष्ट करुन टाकाव्यात.

१५) फवारणी करतांना नोझल बंद पडल्यास ते स्वच्छ करण्यासाठी तोंड लावून फुकू नये अथवा हवा तोडाने आत ओढू नये त्यासाठी सोयीस्कर तार, काडी किंवा टाचणी वापरावी.

१६) किटकनाशके फवारण्याचे काम दर दिवशी आठ तासापेक्षा जास्त वेळ करु नये. हे काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने ठराविक कालावधीने डॉक्टरांकडून स्वतःला तपासून घ्यावे.

१७) किटकनाशके फवारण्याचे काम करतांना वापरण्याचे कपडे स्वतंत्र ठेवावेत व वेळोवेळी स्वच्छ धूवून काढावेत.

१८) किटकनाशके अंगावर पडू नयेत म्हणून वाऱ्याच्या विरुध्द दिशेने फवारणी करु नये.

१९) किटकनाशके मारलेल्या क्षेत्रावर गुरांना चरण्यास कमीत कमी दोन आठवडे जावू देवू नये.

२०) जमिनीवर सांडलेले किटकनाशक हातानी न पुसता व त्यावर पाणी न टाकता ती माती/चिखल यांच्या सहाय्याने शोधून घ्यावेत व जमिनीत गाडून टाकावीत.

२१) डब्यावरील मार्गदर्शक चिन्हाकडे काळजीपूर्वक लक्ष दयावे.

२२) लाल रंगाचे चिन्ह / खून असलेली औषधी सर्वात अधिक विषारी असून त्यानंतर पिवळा, निळा व हिरवा असा क्रम लागतो.

वरील प्रमाणे काळजी घेत फवारणी नियोजन करावे. जेणेकरून आर्थिक तसेच आरोग्य हानी टाळता येते. 

हेही वाचा : न चुकता लक्षात ठेवा 'या' टिप्स; तुमचेही ठिबक चालेल दोन-चार वर्ष अधिक

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीपीक व्यवस्थापनकीड व रोग नियंत्रणआरोग्य