महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण अर्थात महाऊर्जाच्या वतीने महाकृषी ऊर्जा अभियान (पीएम कुसुम योजना घटक-ब) योजनेंतर्गत शेतकऱ्यांना अनुदान तत्त्वावर ३, ५ व ७.५ अश्वशक्ती क्षमतेचे पारेषण विरहीत सौर कृषिपंप देण्यात येत आहे. नेमकी हीच संधी साधून सायबर चोरट्यांनी फसवे संकेतस्थळ, बनावट एसएमएस पाठवून शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न चालविल्याची बाब समोर येत आहे.
या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी फसव्या संकेतस्थळांपासून सावध राहण्याचा सल्ला 'महाऊर्जा'ने दिला. पीएम कुसुम योजनेंतर्गत (घटक -ब) सौर कृषिपंपासाठी पात्र लाभार्थ्यांना सौर पंपाच्या क्षमतेनुसार खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यास १० टक्के आणि अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांस ५ टक्के लाभार्थी हिस्सा भरण्यासाठीचा एसएमएस पाठविला जातो.
ही योजना राबविण्याकरिता महाऊर्जाच्या वतीने स्वतंत्र ऑनलाइन पोर्टल तयार करण्यात आले आहे. परंतु सद्य:स्थितीत सायबर चोरट्यांकडून वेगवेगळे बनावट संकेतस्थळ, सोशल मीडिया प्लॅटफार्म इत्यादींमार्फत शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक करण्यात येत आहे, तसेच शेतकऱ्यांना लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी खोटे संदेश (एसएमएस) पाठविण्यात येत असल्याचे महाऊर्जा विभागाच्या निदर्शनास आले आहे.
अशा खोट्या / फसव्या संकेतस्थळांना / फसव्या दूरध्वनी / भ्रमणध्वणीच्या संभाषणाला व आवाहनाला शेतकऱ्यांनी बळी पडू नये, अशा संकेतस्थळांवर / ॲपवर कोणत्याही पद्धतीने पैशांचा भरणा करू नये, असे आवाहन महाऊर्जा विभागीय महाव्यवस्थापकांनी केले.
महाऊर्जाचे अधिकृत संकेतस्थळ कोणते? लाभार्थी शेतकऱ्यांसाठी महाऊर्जाने अधिकृत संकेतस्थळ निर्माण केले आहे. कुसुम डॉट महाऊर्जा डॉट कॉम/सोलर/बेनिफिशरी/रजिस्टर/कुसुम-योजना कंपोनंट-बी आणि कुसुम डॉट महाऊर्जा डॉट कॉम /बेनिफिशरी या ऑनलाइन लिंक व्यतिरिक्त महाऊर्जाच्या वतीने कोणत्याही प्रकारे शेतकऱ्यांचे अर्ज स्वीकारण्यात येत नाहीत, असे महाऊर्जा विभागाने स्पष्ट केले.