Join us

Talathi Bharti 2024 : तलाठी पदांची नियुक्ती प्रक्रिया अंतिम टप्प्यात राज्यात नवीन २७११ तलाठी रुजू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2024 10:18 AM

राज्यात तलाठी पदांची नियुक्ती प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली असून, आतापर्यंत २ हजार ७११ जणांनी नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत.

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे अडकलेली तलाठी पदांची नियुक्ती प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली असून, आतापर्यंत २ हजार ७११ जणांनी नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत.

लोकसभा निवडणुकीपूर्वी २१ जिल्ह्यांमधील ९८२ उमेदवारांना नियुक्ती पत्रे देण्यात आली होती, तर आचारसंहितेनंतर १७२९ जणांना नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत.

आदिवासी क्षेत्रातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील पदांची नियुक्ती अद्याप झाली नसली, तरी अन्य प्रवर्गातील नियुक्ती करण्यात आल्याची माहिती राज्याचे अतिरिक्त जमाबंदी आयुक्त आनंद भंडारी यांनी दिली.

जून २०२३ मध्ये तलाठी पदांच्या ४ हजार ७९३ जागांसाठी १० लाख ४१ हजार ७१३ एवढे अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी ८ लाख ६४ हजार ९६० उमेदवारांनी परीक्षा दिली. परीक्षेनंतर या पदांसाठी ४ हजार १८८ उमेदवारांची निवड करण्यात आली होती.

मात्र, पेसा क्षेत्रातील अर्थात आदिवासी बहुल क्षेत्रातील जिल्ह्यांमधील पदभरतीविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्याने राज्यातील १३ जिल्ह्यांमधील निकाल राखून ठेवण्यात आला.

पहिल्यांदा जाहीर करण्यात आलेल्या गुणवत्ता यादीनंतर २१ जिल्ह्यांमध्ये यशस्वी उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. पेसा क्षेत्र वगळून अन्य २३ जिल्ह्यांमध्ये ९८२ जणांना नियुक्ती देण्यात आली होती.

पेसा क्षेत्रातील अनुसूचित जमातींव्यतिरिक्त १ हजार १४७ उमेदवारांना नियुक्ती पत्रे देण्यात आली आहेत. आचारसंहितेपूर्वी ९८२, तर आचारसंहितेनंतर १ हजार १४७ अशा एकूण २ हजार ७११ उमेदवारांना तलाठी पदावर रुजू होता आले आहे.

अद्यापही २ हजार ८२ जागांवर नियुक्ती झालेली नाही. तर नांदेड, नंदूरबार, गडचिरोली, बुलढाणा, भंडारा या जिल्ह्यांत अद्याप एकाही उमेदवाराला नियुक्ती देण्यात आलेली नाही.

जिल्हानिहाय नियुक्तीमुंबई शहर १३, मुंबई उपनगर ३२, रायगड १७०, रत्नागिरी ५३, सिंधुदुर्ग ६३, सोलापूर १६२, सातारा ७९, सांगली ७१, कोल्हापूर ३८, नागपूर १५०, वर्धा ७७, गोंदिया ६३, अकोला ३१, वाशिम २१, संभाजीनगर ५९, बीड १४०, परभणी ८१, धाराशिव १०९, जालना ७२, लातूर १७, हिंगोली ६३, यवतमाळ १०४, पालघर १६, पुणे २५०, नगर १८९, धुळे १३५, नाशिक ११७, जळगाव १९५, चंद्रपूर ९०, ठाणे ५१.

टॅग्स :राज्य सरकारनोकरीसरकारमहसूल विभागलोकसभा निवडणूक २०२४