राज्यात नुकत्याच घेण्यात आलेल्या तलाठी भरती परीक्षेतील प्रश्नांवर घेण्यात आलेल्या आक्षेपांचे पुनर्विलोकन करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिल्यानंतर ७९ प्रश्नांवरील आक्षेप मान्य करण्यात आले आहेत.
त्यामुळे या प्रश्नांतील बदलानुसार गुणवत्ता यादीमध्ये बदल करण्यात आला असून, ३६ जिल्ह्यांच्या सुधारित गुणवत्ता याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.
नवीन निवड यादी लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती राज्य तलाठी परीक्षा प्रभारी समन्वयक तथा अपर जमाबंदी आयुक्त व अतिरिक्त भूमी अभिलेख संचालक सरिता नरके यांनी दिली.
याबाबत नरके म्हणाल्या, 'आता प्रश्नोत्तर तालिकेतील एकूण २१९ प्रश्नांमध्ये व त्यांच्या उत्तर सचीत बदल करण्यात येत आहे. एकूण ३९ प्रश्नांचे पर्याय नव्याने दुरुस्त करण्यात आले आहेत. तसेच १८० प्रश्नांचे संपूर्ण गुण त्या सत्रातील विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यानुसार उमेदवारांच्या लॉगिन खात्यात योग्य ती सुधारणा करण्यात येत आहे. तसेच प्रश्ननिहाय दुरुस्तीची माहिती प्रसिद्ध करण्यात आली. यातील बदलानुसार आता यादीमध्ये बदल झाला आहे.
यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या निवड यादीतील यशस्वी उमेदवारांना अद्याप नियुक्ती देण्यात आलेली नाही. नव्याने जाहीर करण्यात आलेल्या गुणवत्ता यादीत यातील बहुतांश उमेदवार कायम राहतील. नव्याने निवड यादी, प्रतीक्षा यादीही जाहीर करण्यात येईल. त्यानंतर नियुक्ती देण्यात येईल. - सरिता नरके, राज्य तलाठी परीक्षा, प्रभारी समन्वयक