Join us

तलाठी भरती; कट ऑफ होणार की पुन्हा परीक्षा द्यायची

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 12:51 PM

लाठी भरतीसाठी झालेल्या परीक्षेतील घोळ उघडकीस आल्यानंतर ही परीक्षा पास झालेल्या भावी तलाठ्यांच्या भरतीची नौका वादंगात सापडली आहे. परीक्षार्थीमध्ये कट ऑफ किती मार्काना लावणार, आता ज्यांना १५० ते २०० दरम्यान मार्क मिळाले ते तरी खरे आहेत का, किंवा पुन्हा परीक्षा द्यावी लागणार, असा संभ्रम आहे.

इंदुमती गणेशकोल्हापूर : तलाठी भरतीसाठी झालेल्या परीक्षेतील घोळ उघडकीस आल्यानंतर ही परीक्षा पास झालेल्या भावी तलाठ्यांच्या भरतीची नौका वादंगात सापडली आहे. परीक्षार्थीमध्ये कट ऑफ किती मार्काना लावणार, आता ज्यांना १५० ते २०० दरम्यान मार्क मिळाले ते तरी खरे आहेत का, किंवा पुन्हा परीक्षा द्यावी लागणार, असा संभ्रम आहे. जिल्ह्यातील ११ हजार उमेदवार आता ऑक्सिजनवर आहेत. राज्यातील ४ हजार ६५७ तलाठी पदभरतीसाठी १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबरदरम्यान टीसीएस कंपनीद्वारे ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली.

यातील अंतिम गुणवत्तायादी ५ जानेवारीला प्रसिद्ध करण्यात आली. परीक्षा २०० मार्काची होती; पण अनेकजणांना २१४ मार्क मिळाले आहेत, ज्यांना अत्यंत कमी मार्क पडतील अशी अपेक्षा होती त्यांनीही मार्काचा १५० चा आकडा पार केला आहे. पेपर आधीच फुटल्याचा व डमी विद्यार्थी बसविल्याचे आरोप झाले आहेत. त्यामुळे माजी खासदार राजू शेट्टी यांनीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देऊन ही परीक्षा 'एमपीएससी'मार्फत घ्यावी, अशी मागणी केली आहे.

अधिक वाचा: तलाठी भरती; गुण जास्त दिसत असले तरी मेरिटप्रमाणे नियुक्ती

या सर्व वादंगाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा दिलेल्या विद्याथ्यांमध्ये संभ्रम आहे. जिल्ह्यात तलाठीची ५६ पदे रिक्त आहेत, त्यासाठी ११ हजार उमेदवार परीक्षेला सामोरे गेले. तर अन्य जिल्ह्यांतील पदासाठी कोल्हापुरातून ४९ हजारांवर उमेदवारांनी परीक्षा दिली. त्यांच्यावर आता आपली भरती होणार की पुन्हा अभ्यास करावा लागणार ही टांगती तलवार आहे.

प्रशासनही अंधारातजिल्ह्यात तलाठीची ५६ पदे रिक्त आहेत; पण त्यामध्ये वाढ झाल्याचे समजले आहे. काही सज्जे फोडण्यात आले आहेत; पण किती आणि ते कोणकोणते सज्जे आहेत, हे माहिती नाही. कोणत्या आरक्षणाअंतर्गत तिथे भरती केली जाईल हे अंधारात आहे. स्थानिक प्रशासनाकडे फक्त परीक्षा घेण्याची जबाबदारी होती. त्यामुळे त्यांच्याकडेही या प्रश्नांची उत्तरे नाहीत.

आम्हाला परीक्षेत २१४ मार्क मिळाले आहेत. कट ऑफ नियमाने भरती होणार की पुन्हा परीक्षा द्यावी लागणार हे अजून कळालेले नाही, कट ऑफ झाला तर किती मार्काना आणि हे मार्क तरी खरे आहेत का, हे कसे आणि कोण ठरविणार असा सगळाच संभ्रम आहे. - प्रियांका, परीक्षार्थी विद्यार्थिनी

टॅग्स :सरकारराज्य सरकारनोकरीव्यवसायविद्यार्थीपरीक्षा