साहेबराव हिवराळे
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अंबेलोहळ (ता. गंगापूर) परिसरात चिंच फोडण्याच्या कामामुळे अनेकांना हाताला काम मिळाले आहे. या कामामुळे शेकडो कुटुंबांचा रोजीरोटीचा प्रश्न काही अंशी मार्गी लागला आहे. अलीकडच्या काही वर्षात चिंचेची मोठी बाजार पेठ म्हणून अहिल्यानगरचीबाजारपेठ प्रसिद्ध आहे.
गंगापूर तालुक्यामधून आंबेलोहळ हे गाव गेल्या १०-१२ वर्षांपासून या व्यवसायात उतरले आहे. राज्यातून व राज्याबाहेरूनही चिंच खरेदीसाठी येथे व्यापारी येतात. झाडावरील चिंचा काढल्यानंतर त्या फोडण्यासाठी रोजगारी महिलांना घरी देऊन फोडून घेतलेल्या जातात. चिंचा फोडण्याचा दर १२ रुपये प्रति किलो असा आहे.
एक महिला घरातील काम पूर्ण करून रोज दहा ते पंधरा किलो चिंच फोडते. त्यातून दिवसाकाठी दीडशे ते दोनशे रुपये मिळतात. या वर्षी फोडलेली चिंच प्रति क्विंटल दर ३,५०० ते १५,००० रुपये क्विंटल दर आहे.
आंबेलोहळ गावामध्ये चिंचेचे स्थानिक व्यापारी असून, बाहेरूनही काही व्यापारी येऊन येथे व्यवसाय करतात. चिंच हा स्वयंपाकघरातील एक आवश्यक पदार्थ असल्याने या धंद्याला मरण नाही.
शेकडो मजुरांना काम
चिंचेमुळे सध्या अंबेलोहळ परिसरातील शेकडो मजुरांना काम मिळाले आहे, असे गंगापूर सहकारी साखर कारखान्याचे संचालक दिलीप बनकर यांनी सांगितले.
पोट भरण्याइतपत उत्पन्न मिळते..
मोजून चिंच घरी आणायची. चिंच फोडून टरफल, शिरा, चिंचोका व फोडलेली चिंच वेगळी करून पुन्हा वजन करून द्यायचे. कुटुंबीयही यासाठी मदत करत असल्याने, आठवड्याच्या बाजारहाटापुरते उत्पन्न मिळत असल्याचे महिला कामगार सांगतात. तर अंबेलोहळ या गावात सध्या जवळपास १० ते १२ व्यापारी आहेत. - लतीफखाँ नूरखाँ, व्यापारी.