Join us

दुष्काळाची कहाणी मांडताना शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2023 10:40 AM

केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाने बुधवारी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. कुणाच्या शेतात तूर पिकाचे नुकसान झाले तर कुणाच्या बांधावर मका पीक बाधित झाले आहे. दुष्काळाची करुण कहाणी सांगताना शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले.

केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाने बुधवारी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. कुणाच्या शेतात तूर पिकाचे नुकसान झाले तर कुणाच्या बांधावर मका पीक बाधित झाले आहे. दुष्काळाची करुण कहाणी सांगताना शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले. या दुष्काळ पाहणी पथकात केंद्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अतिरिक्त सल्लागार ए. मुरलीधरण व केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण विभागाच्या उपसचिव सरोजिनी रावत यांचा समावेश आहे.

बुधवारी दुपारी केंद्रीय पथक सोलापुरात दाखल झाले. त्यानंतर या पथकाने सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी माळशिरस तालुक्यातील सुळेवाडी येथून केली, येथील शेतकरी सुनील मोहन हाके यांच्या शेतातील तूर पिकाची पाहणी केली. शेतकरी दयानंद कोळेकर यांच्या शेतातील विहिरीतील पाणी पातळीची पाहणीही पथकाकडून करण्यात आली. शिंगोर्णी येथील शेतकऱ्यांच्या शेतातील दुष्काळामुळे नुकसान झालेल्या मका पिकाची ही पाहणी पथकाकडून करण्यात आली. तर सांगोला तालुक्यातील आचकदणी, महूद बुद्रुक येथील शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन मका, ज्वारी, ऊस डाळिंब या पिकांची पाहणी त्यांनी केली यावेळी अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावर्षी जिल्ह्यात कमी पाऊस झाला.

शासनाने माळशिरस, बार्शी, सांगोला, माढा व करमाळा या पाच तालुक्यासह जिल्ह्याच्या उर्वरित तालुक्यातील ४५ महसूल मंडळात दुष्काळ जाहीर केला आहे. केंद्र शासनाकडून दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मदत करते. त्याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी दोन सदस्यीय केंद्रीय पाहणी पथक सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पथकातील सदस्यांनी त्यांच्याशी संवाद साधला. तसेच शेतकऱ्यांच्या शेतातील सिंचन विहिरी व पाझर तलावाचीही प्रत्यक्ष पाहणी करून त्यांनी आढावा घेतला.

पथक आज करमाळ्यातगुरुवारी, १४ डिसेंबर रोजी सकाळी पथक करमाळ्यातील मलवडी, घोटी, वरकुटे, नेरले व सालसे या गावातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करून शेतकऱ्यांची चर्चा करणार आहे. केंद्रीय पथकाकडून दुष्काळी परिस्थितीची पाहणीनुसार केंद्र शासनाला अहवाल सादर करण्यात येईल व त्यानंतर केंद्र शासनाकडून त्या अहवालानुसार मदत जाहीर होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :दुष्काळसोलापूरशेतकरीजिल्हाधिकारीकेंद्र सरकारसरकारपीक