Join us

नॅशनल शुगर फेडरेशन, दिल्ली यांचेमार्फत साखर उद्योगासाठी तांत्रिक चर्चासत्राचे आयोजन

By बिभिषण बागल | Published: August 03, 2023 9:00 AM

चर्चासत्रात ब्राझील देशातील ऊस स्वच्छतेच्या यांत्रिक प्रणाली तसेच बायो सी.एन.जी. च्या अद्यावत तंत्रज्ञानाबाबतची त्या देशातील तज्ञाची सादरीकरणे होणार आहेत.

महाराष्ट्रातील सर्व सहकारी व खाजगी साखर कारखान्याचे अध्यक्ष कार्यकारी संचालक व संबंधित अधिकाऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण तांत्रिक चर्चासत्र दिल्ली येथील नॅशनल शुगर फेडरेशन मार्फत शनिवार दिनांक १२ ऑगस्ट, २०२३ रोजी मांजरी, पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट येथे आयोजित करण्यात आले आहे. या चर्चासत्रात ब्राझील देशातील ऊस स्वच्छतेच्या यांत्रिक प्रणाली तसेच बायो सी.एन.जी. च्या अद्यावत तंत्रज्ञानाबाबतची त्या देशातील तज्ञाची सादरीकरणे होणार आहेत.

शेतातून तोड होऊन गाळपासाठी जो ऊस येतो त्या सोबत धसकट. कचरा, माती, वाळू दगडाचे खडे ऊसाची मुळे, पाचट हे देखील येतात. ते गाळपापूर्वी वेगळे करण्याची सोय नसल्याने ऊस तसाच गाळला गेल्याने कारखान्यात बसवलेल्या महागड्या यंत्रसामुग्रीचे नुकसान होणे. गाळप क्षमतेवर विपरीत परिणाम होणे आणि त्याच्या परिणाम स्वरुप साखर उताऱ्यावर प्रतिकुल परिणाम होणे या सारख्या समस्या सर्वच साखर कारखान्यांना वर्षानुवर्षे भेडसावत आहेत. सध्या बऱ्याच प्रमाणात ऊसतोडणी यंत्रामार्फत ऊसतोड होत आहे आणि नजीकच्या भविष्यात याचे प्रमाण वाढतच राहणार आहे. ऊसतोडणी यंत्रामार्फत झालेल्या ऊसतोडीमध्ये या इसकटांचे प्रमाण अधिक असल्याचे निदर्शनास येत आहे.

वरील पार्श्वभूमी लक्षात घेता जून महिन्यात नॅशनल फेडरेशन मार्फत ब्राझील इया देशामधील साखर उद्योगाचा अभ्यास दौरा आयोजित केला होता. त्या दरम्यान असे निदर्शनास आले की 'जनरल चेन्स दा ब्राझील' या कंपनीकडे ऊस स्वच्छतेच्या यांत्रिक प्रणालीचे तंत्रज्ञान उपलब्ध आहे. या प्रणालीचा यशस्वी वापर होत असलेल्या तिथल्या कारखान्यांना प्रत्यक्ष भेट देवून याची खात्री केल्यानंतर ब्राझीलच्या या कंपनीच्या तज्ञ अधिकाऱ्यांना भारत भेटीचे निमंत्रण दिले आहे.

नॅशनल फेडरेशन तर्फे शनिवार दिनांक १२ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ११.३० वाजता या कंपनीतर्फे वसंतदादा शुगर इन्स्टिटयुट, मांजरी बुद्रुक, जिल्हा पुणे येथे सादरीकरण आयोजित केले आहे. कंपनीच्या तज्ञांच्या पोर्तुगिज भाषेतील सादरीकरणाचे तसेच चर्चा/प्रश्नोत्तरांचे मराठी भाषांतर करण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे.

वरील कार्यक्रमासोबत "Bio- CNG " या नव्या तंत्रज्ञानाबद्दलचे सादरीकरण करण्याचे आयोजन करण्यात आले आहे. या दोनही विषयाचे महत्व आणि साखर उद्योगाच्या भविष्यासाठी असणारी उपयुक्तता लक्षात घेऊन सदरहू कार्यक्रमासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटचे अध्यक्ष मा. श्री. शरदचंद्रजी पवार स्वतः उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तसेच इतर विषयतज्ञ देखील चर्चासत्रात सहभागी होणार आहेत. महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री मा.नामदार श्री. दिलीप वळसे पाटील तसेच मा. आमदार श्री. जयंत पाटील हे देखील उपस्थित राहणार आहेत. 

टॅग्स :ऊससाखर कारखानेशरद पवारपीकदिल्लीपुणे