उमेश धुमाळ
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागामध्ये लोणी, धामणी, खडकवाडी, वाळुंजनगर, वडगावपीर, रानमळा या दुष्काळी भागामध्ये भाजीपाला पिकाशिवाय सहजासहजी शेतकरीवर्ग दुसऱ्या पिकांकडे वळत नाही. पण मागील काही वर्षांमध्ये शेतीमालाला हवा तसा बाजारभाव मिळत नसल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे.
त्यामुळे येथील शेतकरी पारंपरिक शेतीला फाटा देत नवीन तंत्रज्ञानाच्या जोरावर तरुणवर्गाने फळ पिकाकडे लक्ष केंद्रित करू लागला आहे. वाळुंजनगर, ता. आंबेगाव येथील तरुण शेतकरी जयेश वाळुंज याने कलिंगड शेती करण्याचा निर्णय घेत दोन लाख रुपये उत्पन्न मिळवले आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे एकरी २८ ते ३० टन कलिंगडाचे उत्पादन त्याने मिळवले आहे. पारंपरिक पद्धतीने शेती न करता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हमखास शेती नफ्याची करता येते, असे तो आवर्जून सांगतो, त्याने केलेल्या मेहनतीला यश आले असून, कमी श्रमामधे पैसे मिळवता येतात तसेच परिसरातील शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेत शेती करावी व नवनवीन प्रयोग शेतीत करावे, असेही आवाहन केले आहे.
कलिंगडाची शेती करण्यासाठी त्याने प्रथम आपल्या शेतात ट्रॅक्टरच्या साहाय्याने सहा फुटांच्या अंतरावर बेड तयार केले. त्यामध्ये खतांचा बेसल डोस टाकल्यानंतर ड्रिप आणि मल्चिंग पेपर करून कलिंगडाची लागवड केली.
या कालावधीमध्ये वातावरणातील बदलामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या फवारण्या करत यशस्वी कलिंगड शेतीचा प्रयोग करत मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतल्याचे तरुण शेतकरी जयेश वाळुंज सांगतो.