Join us

मराठवाड्यात पुढील दोन दिवसात तापमानात होणार वाढ

By मुक्ता सरदेशमुख | Published: October 03, 2023 4:14 PM

शेतकऱ्यांनी पीकांची काय काळजी घ्यावी‌?

राज्यात मागील आठवड्यात जोरदार पावसाने हजेरी लावल्यानंतर आता मराठवाड्यात उन्हाचा चटका वाढणार आहे.  पुढील दोन दिवसात तापमानात वाढ होणार असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवला आहे. आज तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस अपेक्षित असून हवामान कोरडे राहणार आहे. पुढील दोन ते चार दिवसात कमाल तापमानात हळूहळू २ ते ३ अंश सेल्सियसने वाढ होण्याची शक्यता आहे.  मराठवाड्यात बाष्पोत्सर्जनाचा वेग किंचित वाढलेला आहे तर जमिनीतील ओलावा कमी झाल्याचे उपग्रहांच्या छायाचित्रांमधून समोर आल्याचेही स्पष्ट होत आहे. विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक ५ ते ११ ऑक्टोबर दरम्यान पाऊस सरासरीएवढा ते सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.दिनांक ८ ते १४ ऑक्टोबर दरम्यान कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. दरम्यान,वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

मागील आठवड्यात झालेल्या पावसाने कापसामध्ये रस शोषण करणाऱ्या आळ्यांचा प्रार्दुभाव झाल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. या किडींच्या व्यवस्थापनासाठी काय काळजी घ्यावी?

कापूस

  • कापूस पिकात रसशोषण करणाऱ्या किडींच्या व्यवस्थापनासाठी, फ्लोनिकॅमिड 50% डब्ल्यूजी 60 ग्रॅम किंवा बुप्रोफेंझिन 25% एससी 400 मिली किंवा डायनोटेफ्युरॉन 20% डब्ल्यूजी 60 ग्रॅम किंवा डायफेनथ्यूरॉन 50% डब्ल्यूपी 240 ग्रॅम प्रति एकर  फवारणी करावी.  
  • कापूस पिकात बाह्य बोंड सड दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी प्रोपिकोनॅझोल 25% ईसी  200 मिली किंवा प्रोपीनेब 70% डब्ल्यूपी 500 ग्रॅम किंवा पायरॅक्लोस्ट्रोबीन 20 % डब्ल्यूजी  200 ग्रॅम प्रति एकर  फवारणी करावी. 
  • कापूस पिकात अंतर्गत बोंड सड दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी कॉपर ऑक्सीक्लोराईड 50% डब्ल्यूपी 500 ग्रॅम प्रति एकर  फवारणी करावी. 
  •  कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी हेक्टरी 5 गुलाबी बोंडअळीसाठीचे कामगंध सापळे लावावेत. कापूस पिकातील डोमकळ्या वेचून नष्ट कराव्यात. 
  • प्रादूर्भाव जास्त आढळून आल्यास प्रोफेनोफॉस 50% 400 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 88 ग्रॅम किंवा प्रोफेनोफॉस 40% + सायपरमेथ्रीन 4% 400 मिली (पूर्वमिश्रीत किटकनाशक) प्रति एकर आलटून पालटून  फवारावे. 
  • कापूस पिकात पातेगळ व बोंडगळ दिसून येत असल्यास एनएए 2.5 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून  फवारणी करावी.  

तूर, भुईमुगावर करा फवारणी

मागील आठवडयात झालेला पाऊस व ढगाळ वातावरणामूळे, तुर पिकात पाने गुंडाळणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा अझाडिरेक्टीन 1500 पीपीएम 30 मिली किंवा क्विनॉलफॉस 25% 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून  फवारणी करावी. तूर पिकात फायटोप्थोरा ब्लाइट रोगाच्या व्यवस्थापनासाठी ट्रायकोडर्मा किंवा बायोमिक्सची 200 ग्रॅम/200 मिली प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे रोगग्रस्त भागामध्ये आळवणी करावी.

उशीरा पेरणी केलेल्या भूईमूग पिकात मावा, फुलकिडे याच्या व्यवस्थापनासाठी इमिडाक्लोप्रिड 17.8 एस एल 2 मिली किंवा क्विनॉलफॉस 25 ईसी 20 मिली किंवा लॅमडा सायहॅलोथ्रीन 5 ईसी 6 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून  फवारणी करावी.

लागा रब्बीच्या तयारीला..

 काढणीस तयार असलेल्या मधु मका पिकाची काढणी करून घ्यावी. जेथे शक्य आहे तेथे रब्बी ज्वारी पिकाच्या पेरणीसाठी पूर्व मशागतीची कामे करून घ्यावी. रब्बी ज्वारी पिकाची पेरणी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या पंधरवाडयात (1 ते 15 ऑक्टोबर) करावी. जेथे शक्य आहे तेथे रब्बी सुर्यफुल पिकाच्या पेरणीसाठी पूर्व मशागतीची कामे करून घ्यावी. रब्बी सुर्यफलाची पेरणी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या पंधरवाडयात करावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

काढणीस तयार असलेल्या केळी घडांची काढणी करून घ्यावी. नवीन लागवड केलेल्या केळी बागेत कुकुम्बर मोझॅक विषाणू ग्रस्त रोपे दिसून आल्यास उपटून नष्ट करावीत.  द्राक्ष बागेत ऑक्टोबर छाटणीची पूर्व तयारी करावी. द्राक्ष छाटणीच्या पंधरा ते वीस दिवस आधी जमिनीत कॅल्शियम कार्बोनेट किंवा सोडियम  किती प्रमाणात आहे यावर अवलंबून, सल्फर/जिप्सम, शेणखत/कम्पोस्ट खत ईत्यादींसह माती दुरूस्ती म्हणून वापरावे. ते जमिनीवर न सोडता जमिनीत मिसळावे. पूर्ण वाढलेल्या व काढणीस तयार असलेल्या सिताफळ फळांची काढणी करावी व प्रतवारी करून बाजारपेठेत पाठवावी.

भाजीपाला

काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. मागील आठवडयात झालेला पाऊस व ढगाळ वातावरणामूळे, भेंडी व काकडी वर्गीय पिकावरील भुरी रोगाच्या व्यवस्थापनासाठी मायक्लोब्युटॅनील 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून  फवारणी करावी. भाजीपाला ( मिरची, वांगे व भेंडी)  पिकात रसशोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10 मीली किंवा  डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून  फवारणी करावी.काकडीवर्गीय पिकात डाउनी मिल्ड्यू चा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास क्लोरोथॅलोनिल 75% डब्ल्यूपी 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून  फवारणी करावी. टोमॅटो पिकावरील करपा रोगाच्या व्यवस्थापनासाठी टेब्यूकोनॅझोल + ट्रायफ्लॉक्सीस्ट्रोबीन 15 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून  फवारणी करावी.

टॅग्स :पीक व्यवस्थापनशेतकरीपाऊसकापूसशेतीकृषी विज्ञान केंद्रशेती क्षेत्र