Join us

Terna Sugar Factory: ‘तेरणा’च्या उसाला धाराशिव जिल्ह्यात मिळाला सर्वाधिक दर, जाणून घ्या किती?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 11:56 AM

Terna Sugar Factory: मराठवाड्यातील सर्वात जुना असणाऱ्या तेरणा शेतकरी साखर कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामात जिल्ह्यात सर्वाधिक ऊस दर शेतकऱ्यांना दिला आहे.

धाराशिव जिल्ह्यातील भैरवनाथ शुगर्स युनिट क्रमांक ६ संचलित येथील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याने सन २०२३-२४ या हंगामातील उसाला जिल्ह्यात सर्वाधिक २ हजार ८२५ भाव दिला. ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या खात्यात ऊस बिलाची ही रक्कम जमाही करण्यात आल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक केशव सावंत यांनी दिली.

मराठवाड्यातील पहिला व महाराष्ट्रातील दुसरा सहकारी साखर कारखाना असलेला ढोकी येथील तेरणा कारखाना मागील बारा वर्षांपासून बंद होता. कारखाना सुरू व्हावा यासाठी ढोकी व परिसरातील शेतकरी, कारखान्याचे सभासद, व्यापारी, कामगार यांनी तेरणा संघर्ष समिती स्थापन करून कोरोना काळात आंदोलने केली. यानंतर बँक प्रशासनाने हा कारखाना भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेतला. यानुसार राज्याचे आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी भैरवनाथ शुगर्सकडे २५ वर्षे भाडेतत्त्वावर हा कारखाना चालविण्यास घेतला. कारखान्याचे कार्यकारी संचालक केशव सावंत यांनी सहा महिन्यांत कारखान्याचे काम पूर्ण करून कारखाना सुरू केला.

दरम्यान, कारखान्याच्या मोळी पूजन कार्यक्रमात पालकमंत्री डॉ. सावंत यांनी जिल्ह्यात सर्वाधिक २ हजार ८२५ रुपये प्रतिटन दर देण्याची घोषणा केली होती. तेरणा कारखान्याने २० नोव्हेंबर ते २० मार्च २०२३ या दरम्यान तब्बल ३ लाख १२ हजार ८७८ मेट्रिक टन उसाचे गाळप केले. गाळप केलेल्या या उसाचे बिलही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर प्रति टन २ हजार ८२५ रुपये या दराप्रमाणे जमा करण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.

टॅग्स :साखर कारखानेउस्मानाबादऊसशेती