शशिकांत गणवीर
चंद्रपुर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील येसगाव शिवारातील नागेंद्र वाढई यांच्या शेतातील हिरवा भाजीपाला खाण्यासाठी एक अनोळखी जोडी शेतात आली. तिला हाकलून लावले तरी परत गेलीच नाही. एक नाही, दोन नाही तीन दिवस होऊनही ती परत जात नव्हती. वाढई हे त्या बैलजोडीची आपल्या बैलजोडीप्रमाणेच संगोपन करत होते.
त्यांनी याबाबत पोलिस पाटलांना सांगितले. त्यांनी लगेच सोशल मीडियावर त्या बैलजोडीचा फोटो टाकला. अन् दुसऱ्याच दिवशी ऋषी रघुनाथ ढोले त्या बैलजोडीचे मालक घरी आले अन् पंचासमक्ष ती बैलजोडी घेऊन गेले. सोशल मीडियाच्या किमयाने बैलजोडी मिळाल्याची चर्चा तालुक्यात चांगलीच रंगत आहे.
वाढई यांच्या शेतात हिरवा भाजीपाल्याची लागवड केली आहे. भाजीपाल्यावर ताव मारण्याकरिता गावातील गुरेढोरे सातत्याने जातात. यात सुमारे ६० हजारांच्या जवळपास असणारी एक अनोळखी बैल जोडी चार दिवसांपासून सतत होत होती. नागेंद्र वाढई हे इतर बैलांना जसे हाकलायचे तसेच त्या बैलजोडीलासुद्धा हाकलण्याचा प्रयत्न केला. मात्र ती जागची हालतच नाही. त्यामुळे त्यांनी त्या बैलजोडीला दानापाणी दिला.
सतत तीन दिवस होऊन कुणी बैलजोडी नेण्यास आला नाही. अन् ती बैलजोडी शेतातून हलण्यास तयार नव्हती. त्याने याबाबतची माहिती येसगाव येथील पोलिस पाटील राजू कोसरे यांना दिली. त्यानी बैलजोडीचे फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल केले. दुसऱ्या दिवशी बैलजोडीचे खरे मालक ऋषी ढोले आले आणि ती बैलजोडी घेऊन गेले.
पंचासमक्ष मूळ मालकांच्या स्वाधीन केली जोडी
पोलिस पाटलांनी सोशल मीडियावर त्या बैलजोडीचा फोटो टाकून ज्याची जोडी असेल त्यांनी गावातील प्रतिष्ठित पंच सोबत येऊन आपली मालकी सिद्ध करून बैलजोडी घेऊन जाण्याचे आवाहन केले. सोशल मीडियावर बातमी वाऱ्यासारखी पसरात गाडीसुर्लाचे ऋषी ढोले आपली बैल जोडी चार दिवसांपासून हरवल्याचे सांगत गावातील काही प्रतिष्ठित नागरिकांसह मालकी हक्क सांगितला.
त्यामुळे गावातील पंचासमक्ष सदर बैल जोडी मूळ मालकास वापस देण्यात आली. तालुक्यात शेळ्ळ्या-बकऱ्या चोरीला जात असल्याच्या घटना सुरू असतानाच एका गरीब शेतकऱ्यांनी आपली प्रामाणिकता दाखवत दुसऱ्याही शेतकऱ्यांच्या भावना समजून घेत विनाअट बैलजोडी परत केल्याने येसगाव येथील नागेद्र वाढई यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
हेही वाचा - नको चिंता हिरव्या वैरणीची; सुका चारा आहाराद्वारे फायदेशीर दुग्धव्यवसायाचा लागला शोध