Join us

'त्या' विक्रेत्याला कृषी विभागाचे अभय का; कारवाई करण्यास दरंगाई 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 5:32 PM

शेतकऱ्यांना निकृष्ट दर्जाचे खते देऊन लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या त्या केंद्रावर कारवाई होणार तरी कधी?

अमरावती

अप्रमाणित नमुने निघाल्याने १७८ रासायनिक खताच्या पोत्यांचा साठा कृषी विभागाने विक्री बंद केली. जिल्ह्यात फक्त एकाच कृषी केंद्रातून या खतांची विक्री झाली. मात्र, त्या केंद्रावर अद्यापही कारवाई न झाल्याने 'त्या' विक्रेत्याला कृषी विभागाचे अभय का, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे.

मागच्या महिन्यात अशाच प्रकारे शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याने सात केंद्रचालकांचे परवाने वर्षभरासाठी निलंबित करण्यात आले होते, हे उल्लेखनीय. कृषी विभागाचा परवाना असलेल्या सातारा जिल्ह्यातील एका कंपनीच्या रासायनिक खतांचे नमुने अप्रमाणित आले.

धामणगाव तालुक्यातील मंगरुळ दस्तगीर येथील बुटले कृषी केंद्रातून ही खते विकली गेली. या कंपनीच्या १७८ पोत्यांचा साठा कृषी विभागाच्या आदेशाने विक्री बंद करण्यात आला आहे. मात्र, त्यापूर्वी शेकडो पोत्यांच्या विक्रीतून परिसरातील शेतकऱ्यांची लाखो रुपयांनी फसवणूक झाली आहे.

डीएपी, एनपीके १०:२६:२६, एनपीके १४:०७:१४ व २४:२४:०० या खतांच्या या नमुन्यांचा अहवाल अप्रमाणित आल्याने संबंधित कंपनीसह व अन्य कारवाईबाबत कृषी विभागाने आयुक्तालयाकडे मार्गदर्शन मागितले, ते अद्याप अप्राप्त आहे. 

ग्रीनफिल्ड ॲग्रीकेम इंडस्ट्रीज (तरडगाव, ता. फलटण, जि. सातारा) व या कंपनीच्या संबंधित जार्डन कंपनीच्या अप्रमाणित खतांमुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे व पिकांचेही नुकसान झाले आहे.

कृषी केंद्र चालकाला बजावली नोटीस एकाच केंद्रातून या खतांचा पुरवठा

• नमुने अप्रमाणित आल्याने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी बुटले केंद्र केंद्राच्या परवानाधारकास नोटीस बजावली आहे. त्या अनुषंगाने त्यांनी खुलासाही सादर केला. मात्र, खतांची ऑफलाइन विक्री व अप्रमाणित नमुने यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक व पिकांचेही नुकसान झाले आहे.

आपण खतांचे उत्पादक नाही, तर विक्रेते आहोत, त्यामुळे खताच्या आतमध्ये काय, हे आपणास माहीत नाही, अशी भूमिका विक्रेत्याने घेतली आहे. या त्यांच्या भूमिकेबाबत कृषी क्षेत्रातील जाणकारांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.

बुटले कृषी केंद्रातून घेतलेले ग्रीनफिल्ड कंपनीच्या रासायनिक खतांचे नमुने अप्रमाणित आले आहेत. याप्रकरणी केंद्र संचालकास नोटीस बजावली. याप्रकरणी २६ सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. - राहुल सातपुते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

एकाच केंद्रातून या खतांचा पुरवठा

• वर्धा जिल्ह्यातून तसेच पुलगाव येथून संबंधित खतांचा पुरवठा झालेला आहे. जिल्ह्यात फक्त मंगरुळ दस्तगीर येथील बुटले कृषी केंद्र या एकाच केंद्राला या रासायनिक खतांचा पुरवठा झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली. या खतांमुळे शेतकऱ्यांना नापिकीला सामोरे जावे लागले.

• शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान व पिकांचे नुकसान झाल्याने कंपनीवर व कृषी केंद्रावर कठोर कारवाई करण्यात यावी आणि नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना योग्य प्रमाणात नुकसानभरपाई मिळावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

टॅग्स :शेती क्षेत्रखतेअमरावतीशेतकरीशेती