Maize crop : आष्टी तालुक्यात ३ हजार ५०० हेक्टरवर मका पिकाची पेरणी झाली असून, ढगाळ वातावरण व कमी पावसामुळे मका पिकावर लष्करी अळीने हल्ला चढविला आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांचे मका पीक वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून, उपाययोजनांबाबत परिपत्रक वाटप केले आहे.
कन्हेवाडी परिसरात मका पिकावर या लष्करी अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून आला आहे. या परिसरात मका पिकावर लष्करी अळी असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी करताच तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे व सहकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकाची पाहणी करत औषधांची माहिती देऊन जनजागृती करून उपाय सुचविले. यावेळी कृषी सहायक धनवडे, आर.डी. सांगळे, नवनाथ सांगळे आदी उपस्थित होते.
आष्टी तालुक्यात दुग्धव्यवसाय शेतीला जोडधंदा म्हणून मोठ्या प्रमाणावर केला जातो. जनावरांना चारा व उत्पन्नदेखील होते. या दृष्टीने मका पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. यंदा वेळेवर पडलेल्या पावसामुळे सध्या पीक चांगले वाढले आहे. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपासून या पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांनी औषध फवारून पीक वाचविण्याचे, तसेच अळीचा नायनाट करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून केले जात आहे.
असा करा लष्करी अळीचा नायनाट
पिकावर लष्करी अळी पडायला सुरुवात झालेली आहे. ही अळी पिकांची पाने कुरतडून खायला सुरुवात करते. व्यवस्थित काळजी घेतली, तर ही अळी नियंत्रणात येऊ शकते. वातावरणामध्ये आर्द्रता चांगली असेल तर लिंबोळी अर्काची फवारणी मका पिकावर करायला हवी. हा सर्वात स्वस्त उपाय आहे. यामुळे ही अळी नष्ट व्हायला मदत होईल. तसेच बाजारामध्ये इतर कीटकनाशके उपलब्ध आहेत. त्यांची फवारणी केली तरीदेखील लष्करी अळी नियंत्रणात येण्यासाठी मोठ्या प्रकारे मदत होऊ शकते.
- गोरख तरटे, तालुका कृषी अधिकारी, आष्टी