Join us

रासायनिक खताची मात्रा वाढली! उत्पादन वाढीच्या अपेक्षेने विक्री जोमात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2024 11:29 AM

शेतजमिनीत रासायनिक खताचा वापर वाढल्याने जमिनीच्या पोतावर याचा दुष्परिणाम होत आहेत.

उत्पादन खर्च कमी आणि अधिक पीक हातात येण्याच्या अपेक्षेने गेल्या काही वर्षांपासून रासायनिक खताचा वापर मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र आहे. यात सर्वाधिक खत ऊस, केळी त्यापाठोपाठ कापूस, सोयाबीन, तूर, रबी हंगामातील गहू, ज्वारीसह इतर पिकांना गत वर्षभरात ७८८ मेट्रिक टन रासायनिक खताचा वापर झाल्याचे समोर आले आहे. शेतजमिनीत रासायनिक खताचा वापर वाढल्याने जमिनीच्या पोतावर याचा दुष्परिणाम होत आहेत.

रासायनिक खताची मात्रा वाढली

शेतीत अधिक उत्पादनाच्या अपेक्षेने रासायनिक खताचा वापर दिवसागणिक वाढत आहे. साधारणतः १९६० पासून युरियापासून रासायनिक खत शेतात टाकण्यास सुरुवात झाली. सध्या रासायनिक खतावर अधिक भर देण्यात येत असून, ५८ हजार हेक्टर शेती क्षेत्रात ७८८ मेट्रिक टन खताचा वापर यावर्षी झाल्याची आकडेवारी पुढे आली आहे. 

युरिया २७५ मेट्रिक टन, डीएपी १३० मेट्रिक एमओपी ६ मेट्रिक टन, सिंगल सुपर, १०-१०-२६, २०-२०-१३, १२-३२-१६, १५-१५-१५ आदी मिश्रखते ३७० मेट्रिक टन यासह इतर खते ७ मेट्रिक टन, असा एकूण ७८८ मेट्रिक टन रबीसह खरिपात रासायनिक खतांचा वापर झाल्याचे पुढे आले आहे. शेतीच्या हेक्टरी खत वापरातून ही माहिती मिळत असून, दरवर्षी कमी-अधिक पाऊस पडण्यावर खताचा वापर त्यानुसार करण्यात येतो. पाऊस अधिक झाल्यास पिके पिवळी पडून वाढ खुंटते, तेव्हा पिकाला अधिक मात्रेची खते द्यावी लागतात.

रासायनिक खताचा वापर कमीत कमी करण्यासाठी शासकीय, सेवाभावी संस्थांकडून प्रयत्न होत असून, त्यास अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. तीस वर्षांपूर्वी शेणखताला शेतकरी महत्त्व देत होते.

यांत्रिकी शेतीवरच अधिकचा भर

जनावराच्या संगोपनाचा खर्च वाढल्याने जनावरांची संख्या झपाट्याने कमी झाली. आधुनिक युगात ट्रॅक्टरसह इतर यंत्राने अधिक प्रमाणात शेतीची कामे होत असल्याची स्थिती आहे. शेती मशागतीपासून ते पीक मळणीपर्यंत यंत्राचा वापर वाढल्याचे चित्र आहे.बैलावर शेती मशागत अवलंबून नसल्याने त्यांची कमी झाल्याने सेंद्रिय खताचे प्रमाण कमी झाले. परिणामी रासायनिक खताचा वापर मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र आहे.

टॅग्स :खतेशेतकरी