Join us

फळपीक विमा परताव्याची रक्कम अखेर बागायतदारांच्या खात्यावर जमा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2023 11:14 AM

फळपीक विमा योजनेंतर्गत (२०२२-२३) च्या हंगामाचा परतावा ऑक्टोबरमध्ये जाहीर करण्यात आला होता. दीर्घ प्रतीक्षेनंतर परताव्याची रक्कम अखेर बागायतदारांच्या खात्यावर शुक्रवारी जमा करण्यात आली. ऐन दिवाळीत पैसे जमा झाल्याने बागायतदारांमध्ये दुहेरी आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

रत्नागिरी: हवामानावर आधारित असलेल्या फळपीक विमा योजनेंतर्गत (२०२२-२३) च्या हंगामाचा परतावा ऑक्टोबरमध्ये जाहीर करण्यात आला होता. दीर्घ प्रतीक्षेनंतर परताव्याची रक्कम अखेर बागायतदारांच्या खात्यावर शुक्रवारी जमा करण्यात आली. ऐन दिवाळीत पैसे जमा झाल्याने बागायतदारांमध्ये दुहेरी आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे पीक उत्पादनावर परिणाम होत असल्याने हवामानावर आधारित फळपीक विमा योजना केंद्र शासनाने जाहीर केली. त्यानुसार जिल्ह्यातील २६ हजार २८२ आंबा व ५,८३५ काजू उत्पादकांनी मिळून एकूण ३२ हजार ११७ बागायतदारांनी एकूण १७ हजार ६२२.४३ हेक्टर क्षेत्राचा विमा उतरविला होता. त्यापैकी काजू उत्पादक ४ हजार ५२ बागायतदारांना सात कोटी ४४ लाख ७५ हजार ९५४ रुपये तर आंबा उत्पादक २४ हजार ६१३ बागायतदारांना ७३ कोटी ७९ लाख ५२ हजार ८० रुपयांचा परतावा जाहीर झाला आहे.

जिल्ह्यातील २४ हजार ६१३ बागायतदारांना ८१ कोटी २४ लाख १८ हजार ३४ रुपयांचा परतावा जाहीर करण्यात आला होता. वास्तविक विमा कालावधी संपल्यानंतर कंपनीकडून ४५ दिवसात बागायतदारांना विमा परतावा रक्कम प्राप्त होणे अपेक्षित आहे. मात्र परतावा चार महिन्यांनी म्हणजेच ऑक्टोबरमध्ये जाहीर करण्यात आला होता. परतावा जाहीर होऊन एक महिन्यानंतर परताव्याची रक्कम बागायतदारांच्या खात्यावर जमा झाली असल्याने बागायतदारांमधून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

हवामानातील बदलामुळे एकूणच आंबा उत्पादन अत्यल्प होते. उत्पादनासाठी केलेला खर्चही बागायतदारांचा न निघाल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यामुळे बागायतदारांना विमा परतावा रक्कम लवकर मिळण्याची अपेक्षा होती दरवर्षी ऑगस्टमध्ये परतावा जाही होतो व गणेशोत्सवापूर्वीच परताव्याच रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाते. यावर्षी परतावा जाही करण्यासह तो खात्यावर जम करण्यासही विलंब झाला आहे.

पात्र शेतकरी१) जिल्ह्यातील काजू उत्पादक कर्जदार ४८८५ व ९५० विनाकर्जदार मिळून ५८३५ काजू उत्पादक शेतकरी विमा योजनेत सहभागी झाले होते.२) यापैकी चार हजार ५२ काजू उत्पादक विमा योजनेसाठी पात्र ठरले आहेत.३) आंबा उत्पादकांपैकी २३.२२९ कर्जदार व ३०५३ बिगरकर्जदार मिळून २६,२८२ आंबा बागायतदारांपैकी २० हजार ५६१ बागायतदार विमा परताव्यासाठी पात्र ठरले आहेत.४) जी प्रकरणे निकषात बसली त्यांचा विमा परतावा मंजूर झाला आहे.

यावर्षी पाऊस कमी झाल्याने ऑक्टोबर हीट चांगलीच जाणवली. त्यामुळे काही ठिकाणी आंबा कलमांना मोहोर प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यामुळे बागांची साफसफाई, कीटकनाशक फवारणीसाठी लागणारा पैसा उभारणे बागायदारांसाठी अवघड बनले होते. पाच महिन्यानंतर काही होईना परताव्याची रक्कम जमा केली आहे. - रमेश मोहिते, बागायतदार

टॅग्स :पीक विमापीकफलोत्पादनपाऊसआंबाआंबाकेंद्र सरकारशेतकरी