Join us

टोमॅटो आवक वाढली अन बाजारभावाची 'लाली' उतरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2023 7:25 PM

140 रुपये किलोवरून टोमॅटो 40 रुपये

संदीप झिरवाळ

महिन्या भरापासून गगनाला भिडलेल्या टोमॅटो दरामुळे सर्वसामान्य ग्राहकांना पावशेर टोमॅटो खरेदीसाठी तीस ते चाळीस रुपये मोजावे लागत होते. मात्र गेल्या चार ते पाच दिवसांपासून बाजारसमितीत टोमॅटो मालाची दुप्पट आवक वाढल्याने टोमॅटो बाजार भावाची लाली मोठ्या प्रमाणात उतरली आहे.

ग्राहकांना आठवड्याभरापूर्वी किमान शंभर ते सव्वाशे रुपये प्रति किलो दराने खरेदी कराव्या लागणाऱ्या टोमॅटोला आता किलोला 40 रुपये मोजावे लागत असल्याने सर्वसामान्य ग्राहकांनी समाधान व्यक्त केले आहे.

गेल्यावर्षी मोठ्या प्रमाणावर टोमॅटो उत्पादन झाल्याने बाजारभाव पूर्णपणे कोसळले होते त्यामुळे यावर्षी टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी लागवड कमी केल्याने आवक कमी झाली होती परिणामी बाजारभाव गगनाला भिडले होते. महिन्याभरापूर्वी टोमॅटो दर 100 रुपये किलोपर्यंत गेले होते तर त्यात आणखी वाढ होऊन आठवड्या भरापूर्वी टोमॅटो दर 135 रुपये प्रति किलो पर्यंत पोहचले होते.

टोमॅटो दर वाढलेले असल्याने सर्वसामान्य नागरिकांचे स्वयंपाक बजेट बिघडले होते तर रोजच्या वरण व भाता बरोबर लागणारी टोमॅटो कोशिंबीर व हॉटेलात सलादमध्ये मिळणारा टोमॅटो गायब झाला होता.

महिन्याभरापूर्वी केवळ सिन्नर तालुक्यातील टोमॅटो माल दाखल व्हायचा दैनंदिन 2 ते 3 हजार क्रेट टोमॅटो विक्रीला येत असल्याने आवक कमी व मागणी अधिक असल्याने बाजारभाव तेजीत होते मात्र गेल्या चार ते पाच दिवसां पासून नवीन टोमॅटो बाजारात विक्रीसाठी दाखल झाल्याने दैनंदिन सात ते आठ हजार क्रेट टोमॅटो दाखल होत आहे.

आवक वाढत चालल्याने टोमॅटो बाजारभावाची लाली घसरत चालल्याने उत्पादक शेतकऱ्यांनी काहीशी नाराजी व्यक्त केली तर सर्वसामान्य ग्राहकांना टोमॅटो खरेदीसाठी खिशाला लागणारी आर्थिक झळ बऱ्यापैकी कमी झाल्याने सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

नाशिक कृषी उत्पन्न बाजारसमितीत सिन्नर तालुक्यातील नवीन टोमॅटो माल दाखल होत असून आगामी काळात टोमॅटो आवक वाढ होऊन बाजारभाव आणखी घसरण होण्याची शक्यता बाजारसमिती सूत्रांनी वर्तविली आहे.गेल्या चार पाच दिवसांपासून आवक वाढल्याने टोमॅटो प्रति क्रेटला आठशे ते एक हजार रुपये पर्यंत बाजारभावमिळत आहे.

टॅग्स :शेतकरीशेती क्षेत्रपीकशेती