अमोल कोहळे
रंगपंचमीची चाहूल पळसफुलांनी लागते. ती गोळा करून रंग तयार करणे हा आतापर्यंतचा बाळगोपालांचा आवडता छंद होता. कृत्रिम रंगाने मात्र ही सवयच लयाला गेली आहे. चिमुकल्यांनी या नैसर्गिक रंगांकडे पाठ फिरवली आहे. अमरावती जिल्ह्यातील पोहरा परिसरातील नजीकच्या वनात पळसाची फुले झडून जमिनीवर आरास झाली. आता ती वाळायला लागली असली तरी ती उचलायला अद्याप कुणीही आलेले नाही.
वडाळी आणि चांदूर रेल्वे या वनपरिक्षेत्रातील विस्तीर्ण जंगलात सागाऐवजी पळसाचे झाडे भरपूर मिळतात. म्हणूनच या जंगलाला 'पडसाळी' हे विशेषण आहे. उन्हाळ्याची चाहूल लागताच ओक्याबोक्या झालेल्या या टेकड्यांवर चोहीकडे आता पळस फुलांच्या पाकळ्या पसरलेल्या दिसत आहेत. पूर्वी याच पाकळ्या उकळून तयार केलेल्या नैसर्गिक रंगाने रंगपंचमी साजरी केली जात असे. मात्र, आता कृत्रिम रंगाची झिंग चढल्याने त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
मात्र या कृत्रिम रंगाने त्वचेचे विकार वाढत आहेत. रंगपंचमी आणि पळस फुलांचे घट्ट नाते सांगणारी ही रंगनवलाई अमरावती - चांदूर रेल्वेमार्गाने ये - जा करणाऱ्या प्रवाशांच्या नजरेत भरत आहे.
अशाप्रकारे तयार होतो रंग
लाल गर्द रंगांच्या या फुलांना होळीच्या काही दिवसांपूर्वी पाण्यात भिजवून ठेवले जाते. त्यानंतर ते पाण्यात उकळून त्याचा रंग बनवून, त्याच रंगाने चिमुकले होळी खेळायचे. त्यातून येणाऱ्या सुगंधाने मनमोहक असे वातावरण तयार होत होते. मात्र आता दिवसेंदिवस कृत्रिम रंग आल्याने पळस फुलांच्या रंगांकडे सर्वांनी पाठ फिरविली गेली आहे.
फुले आणि बिया आयुर्वेदात उपयुक्त
आयुर्वेदिक औषधी वनस्पती म्हणूनही पळसाचा वापर होतो. पळसाची फुले पाण्यात टाकून स्नान केले तर त्वचारोग नाहीसा होतो. पळसाच्या बियांचाही औषधीसाठी वापर केला जातो. रंगपंचमीमध्ये पळसाची फुले गोळा करून त्यापासून रंग तयार केला जातो. हा रंग हानिकारक नाही.