नसीम शेख
जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी परिसरात सोमवारी झालेल्या गारपिटीत फुलशेतीलाही मोठा फटका बसला आहे. या गारींमुळे फुलशेतीतील सर्व फुले गळून पडली, तर काही ठिकाणी झाडेही पूर्णतः आडवी झाली आहेत.
टेंभुर्णीसह परिसरात मागील काही वर्षांपासून अनेकजण फुलशेती करू लागले आहेत. तर येथे अनेकांचा फुले व हार विक्रीचा व्यवसाय असल्याने त्यांनी आपल्या शेतातील काही भागात फुलशेती फुलवली आहे. सध्या येथे गलांडा, गुलाब, शेवंती, बिजली आदी फुलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन या फुलांचा भुगा झाल्याचे दिसून आले.
सध्या ही फुले पूर्णतः जोमात असताना अचानक आलेल्या या अस्मानी संकटाने क्षणात या फुलशेतीचे होत्याचे नव्हते झाले. यात फुलशेती उत्पादकांचे मोठे नुकसान झाले असून, शासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी येथील फुलशेती उत्पादक समाधान तांबेकर, अनिल आमले, अरुण आमले आदींनी केली आहे.
सोमवारी अचानक झालेल्या वादळी वाऱ्यांसह गारपीटीने शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती. यात रब्बी पिकांसह फळबागा, भाजीपाला, शेडनेटसह नागरिकांच्या घराचेही नुकसान झाले होते. ज्यामुळे याची जिल्हाधिकान्यांनी देखील पाहणी केली आहे.
आता विकतची फुले आणून व्यवसाय करणे कठीण जाणार, मदत द्यावी
माझ्या शेतात पाऊण एकरमध्ये गुलाब, गलांडा, शेवंती, बिजली आदी फुलांची लागवड केली आहे. यातून निघालेल्या फुलांवर रोज हजार ते दीड हजार रुपयांचे हार विकायचो. त्यावर आमचा घरप्रपंच चालायचा, मात्र, गारपिटीत या फुलशेतीचे पूर्णतः नुकसान झाल्याने आता विकतची फुले आणून हा व्यवसाय करावा लागत आहे. परंतु, तो करणे परवडणारे नाही. तेव्हा शासनाने आर्थिक मदत करून आम्हा फुलशेती उत्पादकांना आधार द्यावा. - समाधान तांबेकर, फुलशेती, उत्पादक, टेंभुर्णी