जयेश निरपळ
कमी पर्जन्यमानामुळे तीव्र दुष्काळाच्या झळा, कांदा रोपांची टंचाई, गगनाला भिडलेले रासायनिक खतांचे दर, वाढलेली भरमसाट मजुरी, अनियमित विजेचे भारनियमन, असे सर्व यज्ञ पार करत तालुक्यातील बळीराजाने कांद्याची लागवड केली. संकटावर मात करीत कांदा पीक काढण्यास आले असतानाच हवामान विभागाने अवकाळीचा इशारा दिल्याने बळीराजा सध्या भरउन्हात कांदा काढणीच्या कामात गुंतला आहे.
यंदाच्या रब्बी हंगामातील कांद्याला लागवडीपासूनच अनेक संकटांचा सामना करावा लागला आहे. सर्व संकटांवर मात करीत कांदा पीक आजमितीला काढणीस आले आहे. सध्या उन्हाची तीव्रता वाढत आहे. त्यातच हवामान अभ्यासकांनी अवकाळी पावसाचा इशारा दिल्याने कांदा काढणीला वेग आला आहे.
उन्हाचा तडाखा वाढत असताना शेतकऱ्यांना कांदा काढावा लागत आहे. मागील वर्षी याच दिवसांत प्रचंड गारपीट झाल्याने रब्बी हंगामातील कांदा पीक नेस्तनाबूत झाले होते. भांडवलसुद्धा निघाले नसल्याने बळिराजाला मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला होता.
चालू वर्षी तालुक्यात अत्यल्प पर्जन्यमानामुळे सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. बारमाही पाणी असलेल्या विहिरींनी मार्चच्या शेवटी तळ गाठण्यास सुरुवात केली. चालू हंगामात कांदा रोपांच्या टाकण्याच्या वेळी अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली होती. याचा परिणाम कांदा रोपांच्या उतरणीवर झाला.
यामुळे चालू रब्बी हंगामात कांदा रोपांचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला. कांदा लागवड पूर्ण करण्यासाठी बळीराजांनी सोन्याच्या दरात कांदा रोप खरेदी करून कांदा लागवड केली. रोपांच्या अकल्पित टंचाईमुळे यंदाच्या हंगामात कांदा लागवड ही जानेवारी महिन्यापर्यंत सुरू होती.
हेही वाचा - टरबूज खाणे फायदेशीर; पण ते केमिकल द्वारे पिकविलेले असेल तर?
मजुरांची टंचाई ठरतेय डोकेदुखी
• पाणीटंचाई व वाढत्या उन्हाच्या प्रकोपामुळे कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला असून, येणाऱ्या उत्पादनात घट निर्माण झाली आहे. त्यातच जो कांदा काढणीस आला आहे. त्याची सर्वत्र काढणी सुरू आहे.
• दरवर्षी बाहेरील मजूर कांदा काढणीसाठी डेरेदाखल होत असतात. यावर्षी सर्वत्र दुष्काळाच्या झळा बसत असल्याने मोठ्या प्रमाणावर मजूर हजेरी लावतील, असा अंदाज बळीराजांकडून बांधला जात होता; पण अद्यापपर्यंत पाहिजे त्या प्रमाणात मजूर उपलब्ध होत नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.