Join us

टोमॅटो जनावरांपुढे; उत्पादन खर्च अन् बाजारभावाचे गणित जुळेना

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2024 10:38 AM

सध्या बाजारात टोमॅटोला कवडीमोल भाव मिळत असल्याने कांबी (ता. शेवगाव) येथील शेतकऱ्यावर अक्षरशः टोमॅटो जनावरांपुढे टाकण्याची वेळ ओढवली आहे.

संजय सुपेकरबोधेगाव : पावसाने पाठ फिरवल्याने यावर्षी शेतकऱ्यांच्या खरीप व रब्बी हंगामातील पिकांचा पार सुपडा साफ झाला. तरीही काळजावर दगड ठेवून काही शेतकऱ्यांनी उन्हाळी बाजरी, ज्वारी, भाजीपाल्यासह फळभाज्यांची लागवड केली.

परंतु, बाजारपेठेत पिकांना योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या जणू जिव्हारी घाव लागत असल्याचे दिसते. सध्या बाजारातटोमॅटोला कवडीमोल भाव मिळत असल्याने कांबी (ता. शेवगाव) येथील शेतकऱ्यावर अक्षरशः टोमॅटो जनावरांपुढे टाकण्याची वेळ ओढवली आहे.

मधुकर भगवान थोरात (वय ६२) असे कांबी येथील टोमॅटो पिकामुळे बेहाल झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी नोव्हेंबरमध्ये उमापूर (ता. गेवराई, जि. बीड) येथील नर्सरीतून टोमॅटोची रोपे विकत आणून पाऊण एकर क्षेत्रात लागवड केले.

मशागत, शेणखत टाकणे, बेड तयार करणे, मल्चिंग पेपर, खते व औषधांचा डोस देणे, रोपांची दोरीने बांधणी करणे, उन्हापासून संरक्षणासाठी कापडी आच्छादन करणे आदी कामे करत मधुकर थोरात यांनी चांगले उत्पन्न साधेल या आशेने टोमॅटोचे पीक घेतले चार महिन्यांत एकरी ४५ ते ५० हजार रुपये खर्चुन टोमॅटोची जोपासना केली.

टोमॅटो तोडणीसाठी शेजारच्या गावांतून मजूर आणून वीस रुपये कॅरेटप्रमाणे मजुरी देत टोमॅटो बाजारपेठेत नेले. सुरुवातीला टोमॅटोला प्रतिकिलो १० ते १२ रुपये भाव साधला. परंतु, सध्या बाजारात व्यापारी ३ ते ४ रुपये भावानेदेखील टोमॅटोला विचारत नसल्याने मधुकर थोरात यांनी संपूर्ण टोमॅटो पीक उपटून टाकले. उत्पादन खर्चही निघत नसल्याने जनावरांना चारा म्हणून टोमॅटो टाकण्याची वेळ त्यांच्यावर आली.

टोमॅटोसाठी एकरी खर्च• मशागत व बेड बनविणे -  ४ हजार रुपये• मल्चींग पेपर टाकण्यासह - ९ हजार रुपये• रोप खरेदी व लागवड - ६ हजार रुपये• खते व औषधे डोस - १५ हजार रुपये• रोप बांधणी खर्च - ७ हजार रुपये• उन्हाळी कापड आच्छादन - ७ हजार रुपये• एकूण खर्च -  ४८ हजार रुपये

मोठ्या मेहनतीने ४५ ते ५० हजार रुपये खर्चुन पहिल्यांदाच टोमॅटोचे पीक घेतले होते. परंतु, साधा उत्पादन खर्चही निघत नसल्याने मोठे नुकसान झाले. टोमॅटो जनावरांना खायला टाकावे लागत आहेत. - मधुकर थोरात, शेतकरी, कांबी

टोमॅटो हे पीक शेतकऱ्यांना कधी मालामाल तर कधी बेहाल करणारे बेभरवशी पीक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन शेतीमालावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांकडे वळणे गरजेचे आहे. - नीलेश ढाकणे, शेतकरी, हातगाव

टॅग्स :टोमॅटोपीकशेतकरीशेतीबाजारमार्केट यार्ड