Join us

उत्पादनखर्च आणि कांद्याला मिळणारा बाजारभाव याचं गणित काही जुळेना

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2024 11:53 AM

कमी पाणी लागणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर करूनही पिकाचे यशस्वी नियोजन केले होते; मात्र निसर्गाच्या बिघडलेल्या समतोलामुळे उत्पादनात झालेली घट आणि अत्यल्प मिळणारा भाव यामुळे शेतकरी हतबल.

खर्चाच्या तुलनेत दर कमी मिळत असल्याने गेल्या वर्षापासून कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. या कांदा पिकाचे अर्थकारण धोक्यात आल्याने या पिकांचे उत्पादन घ्यावे की नाही, असा विचार शिरूर तालुक्यातील कान्हूरमेसाई परिसरातील शेतकरी करताना दिसत आहेत.

बाजारात कांद्याला प्रतिक्विंटल ८०० ते ९०० रुपये मिळाला तरी एकरी १८००० रुपयांची तूट येत असल्याचे शेतकरीवर्ग सांगत आहेत. केंद्र शासनाने कांद्यावरील निर्यातबंदी आता मागे घेतली असली, तरी काही महिन्यांपूर्वी लावण्यात आलेल्या निर्यातबंदीनंतर ३००० रुपये विकला जाणारा कांदा बाराशे रुपये प्रतिक्विंटलपर्यंत विकला गेला शेतकऱ्यांनी बाराशे रुपये प्रतिक्विंटल दर सांगितला जात असला, तरी प्रत्यक्षात ७०० ते ८०० रुपयांचा दर मिळत आहे.

कांद्याला लागणारा प्रतिएकर खर्च आणि मिळणारा दर यांचा ताळमेळ बसत नसल्याचे दिसून येत आहे. कांद्याच्या उत्पादनातही बदललेल्या निसर्गामुळे घट झाली आहे. प्रतिएकरामागे १८ हजार रुपयांपर्यंत आर्थिक झळ सोसावी लागत आहे. त्यामुळे अर्थकारण बिघडल्याने शेतकरी कर्जाच्या विळख्यात सापडला जात आहे. गेल्यावर्षी पावसाचे प्रमाण अत्यल्प होते.

त्यामुळे परिस्थिती दुष्काळी असल्याने खरीप हंगाम पूर्ण वाया गेला होता. त्यामुळे थोड्याफार प्रमाणात उपलब्ध असलेल्या पाण्याचे नियोजन करून शेतकऱ्यांनी लाल कांद्याच्या व्यवस्थापनासाठी ठिबक सिंचन, तुषार सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला.

कमी पाणी लागणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर करूनही पिकाचे यशस्वी नियोजन केले होते; मात्र निसर्गाच्या बिघडलेल्या समतोलामुळे उत्पादनात झालेली घट आणि अत्यल्प मिळणारा भाव यामुळे शेतकरी हतबल झाल्याचे उद्योजक गुलाबराव धुमाळ यांनी सांगितले.

असा येतो एकरी खर्चनांगरट २५००, रोटर दोन हजार रुपये सरी पाडणे, एक हजार रुपये रानबांधणी, दोन हजार रुपये कांदा रोप, १०,००० रुपये कांदा लागवड, तणनाशक १५०० रुपये, निंदणी चार हजार रुपये, रासायनिक खत ६०००, कीटकनाशक तीन हजार रुपये, कांदा काढणे दहा हजार रुपये, वाहतूक खर्च सहा हजार रुपये, वीजबिल ३००० रुपये, पाणी भरणे मजुरी ५००० रुपये, लागवड खर्च एकरी ७० हजार रुपये, एकरी उत्पादन ६० ते ७० क्विंटल, भाव ८०० ते ९०० मिळाला तरी एकरी १८ हजार रुपयांची तूट येत आहे.

कांदा लागवड करण्यासाठी एकरी ६५,००० खर्च येत आहे. त्या तुलनेत कांद्याला सध्या ८०० ते ९०० रुपये प्रतिक्चिंटल दर मिळतो. त्यामुळे एकरी १८,००० रुपयांपेक्षा अधिक तूट येत असल्याने हे पीक घेण्यास सध्या परवडत नाही. - बबन शिंदे, कांदा उत्पादक, कान्हूरमेसाई

अधिक वाचा: कांद्याला चागला बाजारभाव मिळाला पाहिजे असं वाटतंय तर हे करा

टॅग्स :कांदाशेतकरीशेतीसेंद्रिय खतखतेठिबक सिंचनकेंद्र सरकारसरकारबाजारमार्केट यार्ड